इतिहास पुसून टाकता येत नाही, नेहरूंचे योगदान अतुलनीय, मोदी-नेहरू तुलना वादावर शरद पवारांचे स्पष्ट मत

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या मुद्द्यावर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडत नेहरूंच्या योगदानाची आठवण करून दिली.

Untitled Design 66

Untitled Design 66

Sharad Pawar’s clear opinion : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्याच्या राजकीय चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या मुद्द्यावर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडत नेहरूंच्या योगदानाची आठवण करून दिली. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात पवारांनी काँग्रेस, गांधी-नेहरू कुटुंब आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानावर भाष्य करत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी पक्षाच्या जाहिरातींचाही उल्लेख केला. आज विविध वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर पक्षाची जाहिरात पाहून आश्चर्य वाटल्याचे सांगताना, अशा जाहिरातींसाठी लागणारा खर्च लक्षात घेऊन आपण पूर्वी कधी त्या मार्गाने गेलो नसल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पवार म्हणाले की, सत्ता असो वा नसो, लोकांमध्ये राहून काम करणे हीच राष्ट्रवादीची परंपरा राहिली आहे. अनेक नेत्यांनी आपल्या आयुष्यातील मोठा काळ विरोधी पक्षात घालवला, मात्र जनतेच्या प्रश्नांपासून कधीही दूर गेले नाहीत. देशातील बेरोजगारी, आदिवासी, महिला आणि अल्पसंख्याक समाजाच्या समस्या अद्याप गंभीर असल्याचे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका केली.

मोठी बातमी – बीडमध्ये भीषण दुर्घटना, भाविकांची बोट उलटून 50 जण बुडाले

मात्र त्याचवेळी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा जपली पाहिजे, असेही स्पष्ट केले. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असल्याने त्या पदाचा आदर करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे पवार म्हणाले. याच भाषणात त्यांनी नेहरू आणि मोदी यांच्या तुलनेवर भाष्य केले. एखादा नेता किती वर्षे पंतप्रधान राहिला यापेक्षा त्याने देशासाठी काय योगदान दिले, हे अधिक महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. मोदींना दीर्घकाळ पंतप्रधानपद मिळावे अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा असू शकते, मात्र केवळ कार्यकाळाच्या आधारावर नेहरूंशी तुलना होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

नेहरूंचा काळ, त्यांचे कर्तृत्व आणि देशासाठीचे योगदान यांच्याशी तुलना होऊ शकते का? पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यलढा लढला. अनेक वर्षे तुरुंगवास भोगला. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली संघर्ष करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पंडित जवाहरलाल नेहरू हे केवळ स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान नव्हते, तर स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचे शिलेदार होते, याची आठवण करून देत पवारांनी त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष आणि राष्ट्र उभारणीतील भूमिका यामुळे नेहरूंचे स्थान वेगळे असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे नेहरू-मोदी तुलना आणि देशाच्या राजकीय वारशाबाबतची चर्चा पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version