शरद पोंक्षेंच्या भाषणाने खळबळ; संघ हवे तर दहा भाजप उभा करू शकतो, भाजपच्या भविष्यासंदर्भात मोठं विधान

भाजपची काँग्रेस व्हायला लागली, तर संघ दहा नवीन भाजप उभे करू शकतो, असा सूचक इशारा अभिनेते शरद पोंक्षे यांनी दिला.

Untitled Design 7

Untitled Design 7

Sharad Ponkshe’s speech creates a stir : मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी नागपूरमध्ये झालेल्या व्याख्यानमालेत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपची काँग्रेस व्हायला लागली, तर संघ दहा नवीन भाजप उभे करू शकतो, असा सूचक इशारा त्यांनी दिला. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित रामस्मरण व्याख्यानमालेत पोंक्षे बोलत होते. नागपूरच्या रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात भारत एक हिंदू राष्ट्र या विषयावर त्यांनी भाष्य केले.

आपल्या भाषणात पोंक्षे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यातील संबंधांवर स्पष्ट भूमिका मांडली. संघ ही भाजपची आई आहे. पण कोणत्याही पक्षाने अहंकार बाळगू नये. आम्हाला कोणी हरवू शकत नाही, हा भाव धोकादायक ठरू शकतो, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, जर भाजपची वाटचाल काँग्रेससारखी होऊ लागली, तर संघाकडे पर्याय उभे करण्याची ताकद आहे. पुन्हा दहा-पंधरा वर्ष वाट पाहावी लागली, तरी कट्टर हिंदुत्वाच्या विचारावर आधारित नवीन राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो.

अधिकाऱ्यांचे वाईफ स्वॅपिंग अन्… वडेट्टीवारांचे दावे तर पुरावे द्या म्हणत बावनकुळे भडकले

देशातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणावर भाष्य करताना पोंक्षे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे देखील कौतुक केले. आज देशात हिंदू सण मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. आम्ही हिंदू आहोत असे अभिमानाने सांगण्याची ताकद निर्माण झाली आहे. याचे श्रेय मोदी सरकारसोबत संघाला देखील जाते, असे त्यांनी नमूद केले.

शंभर वर्षांच्या प्रवासात संघाने अनेक अडचणींचा सामना केला, तरी देखील तो आज ठामपणे उभा असल्याचे सांगत त्यांनी संघाच्या संघटनात्मक क्षमतेवर विश्वास व्यक्त केला. यावेळी पोंक्षे यांनी मनुस्मृतीबाबतही वादग्रस्त विधान केले. मनुस्मृतीमध्ये कोणालाही दुय्यम वागणूक दिलेली नाही. ज्यांनी तो जाळली, त्यांनी ती वाचलेली नाही, असा दावा त्यांनी केला. या विधानावरून देखील आगामी काळात वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या वक्तव्यामुळे विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता असून, सत्ताधारी पक्षाकडून देखील अधिकृत भूमिका काय येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूरसारख्या संघाच्या बालेकिल्ल्यातून आलेल्या या वक्तव्यामुळे त्याचे राजकीय परिणाम काय होतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version