सहर शेखच्या वडिलांची शिंदेसेनेत वर्णी? युनुस शेख यांच्या नियुक्तीमुळे ठाण्यात राजकीय चर्चांना उधाण

शिंदे यांच्या शिवसेनेशी संबंधित केबल सेनेच्या कळवा-मुंब्रा अध्यक्षपदी युनुस शेख यांची नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र समोर आले आहे.

Untitled Design   2026 10 15T153101.245

Untitled Design 2026 10 15T153101.245

Shiv Sena entrusts major responsibility to Sahar Shaikh’s father : ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधून एमआयएमच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका सहर शेख हिचे वडील युनुस शेख यांच्या एका नियुक्तीमुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी संबंधित केबल सेनेच्या कळवा-मुंब्रा अध्यक्षपदी युनुस शेख यांची नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र समोर आले आहे. मात्र, आपण शिवसेनेत प्रवेश केलेला नसून केबल आणि इंटरनेट सेवेशी संबंधित कामासाठी हे पद स्वीकारल्याचे युनुस शेख यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीवरून राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सहर शेख हिचे एक भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या भाषणात तिने ‘कैसा हरायाsssss…’ असे म्हणत विरोधकांना डिवचले होते. तसेच, आगामी काळात संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा असल्याचे वक्तव्यही तिने केले होते. तिच्या या विधानावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. महायुतीतील नेत्यांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही या वक्तव्यावर टीका करण्यात आली होती. त्यामुळे आता सहर शेख हिच्या वडिलांची शिंदेसेनेशी संबंधित संघटनेच्या पदावर नियुक्ती झाल्याच्या वृत्ताने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.

युनुस शेख यांना नियुक्तीचे पत्र देतानाचे छायाचित्रही समोर आले आहे. या पत्रात त्यांची कळवा-मुंब्रा केबल सेना अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचा उल्लेख आहे. तसेच, ही नियुक्ती एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि आशीर्वादाने करण्यात आल्याचे पत्रात नमूद असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या नियुक्तीवरून विरोधकांकडून शिंदेसेनेला लक्ष्य केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फक्त ॲप डिलीट करून उपयोग नाही! ट्रू कॉलरवरून नंबर हटवण्यासाठी काय कराल?

मात्र, युनुस शेख यांनी आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. आपण गेल्या अनेक वर्षांपासून केबल आणि इंटरनेट सेवा क्षेत्रात कार्यरत असून, त्याच व्यवसायाशी संबंधित केबल सेनेचे पद आपल्याला देण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या शिवसेना प्रवेशाबाबत पसरवल्या जाणाऱ्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, नियुक्तीपत्रावर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख असल्याने या पदाचे स्वरूप आणि त्याचा शिंदेसेनेशी असलेला संबंध यावरून प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे युनुस शेख यांच्या दाव्याबाबत आणि नियुक्तीमागील राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरू आहे.

दरम्यान, युनुस शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यातील जुना राजकीय संघर्षही या प्रकरणाच्या निमित्ताने चर्चेत आला आहे. युनुस शेख हे एकेकाळी जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक मानले जात होते. मात्र, कालांतराने दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. ठाणे महापालिका निवडणुकीच्या वेळी युनुस शेख यांनी आपल्या मुलीसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने सहर शेख हिने एमआयएमकडून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.

Pakistan School Roof : पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळले; विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

निवडणुकीतील विजयानंतर झालेल्या सभेत युनुस शेख आणि सहर शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली होती. युनुस शेख यांनी आव्हाड यांच्यावर निशाणा साधताना, जितेंद्र आव्हाड यांना मी जीजी नाव ठेवले आणि ते महाराष्ट्रात लोकप्रिय झाले. अल्लाहतालाने माझ्या मुलीला हिजाबवाली बेटी म्हणून लोकप्रिय केले, असे विधान केले होते. तसेच, जितेंद्र आव्हाड यांनी यापुढे कोणत्याही मुलीच्या भविष्याशी खेळू नये, असा इशाराही त्यांनी दिला होता.

याशिवाय, तू माझ्या मुलीला उमेदवारी नाकारलीस, पण मी आता माझ्या मुलीला एमआयएममधून निवडून आणले आहे. प्रभाग क्रमांक 30 मध्ये कधी फिरताना दिसलास, तर तुला दाखवतो, असे म्हणत युनुस शेख यांनी आव्हाड यांना थेट आव्हान दिले होते. त्यामुळे सहर शेखचा विजय, आव्हाड यांच्याशी असलेला संघर्ष आणि आता युनुस शेख यांच्या नियुक्तीवरून सुरू झालेली चर्चा या सगळ्या घडामोडींमुळे ठाण्यातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

Exit mobile version