मुंबई : रामदास कदम यांना गद्दारीचा फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडी गद्दारीची भाषा हास्यास्पद आहे, असे म्हणत शिवसेना नेते, खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना टोला लगावला आहे. रामदास कदम यांनी कीर्तिकरांना पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, असा खोचक सल्ला दिला होता. त्यावर किर्तीकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढून प्रत्युत्तर दिले. मुंबईतील लोकसभेच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून शिवसेनेचे हे दोन ज्येष्ठ नेते आमने-सामने आले आहेत. (Shiv Sena leader gajanan kirtikar and ramdas kadam fight over North West Lok Sabha constituency of the Lok Sabha in Mumbai)
अलीकडेच कदम यांनी त्यांचा मुलगा सिद्धेश कदम याच्यासाठी या मतदारसंघावर दावा केला होता. त्यास गजानन कीर्तिकरांनी विरोध दर्शवला होता. मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तो मी खेचून आणला. 2014 ला पावणे दोन लाख तर 2019 ला पावणे तीन लाख मतांनी विजय मिळवला. या मतदारसंघात मी कामं केलीत, करोडो रुपयांचा फंड वापरलाय, लोकांच्या सुखदुःखात सहभागी झालोय, आजही लोकांमध्ये वावरतोय. त्यामुळे इतर कुणीही या मतदारसंघावर दावा सांगू शकत नाही, असे प्रत्युत्तर किर्तीकर यांनी दिले होते.
त्यावर रामदास कदम यांनी खासदार कीर्तिकरांना पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, असा खोचक सल्ला दिला होता. गजानन कीर्तिकरांनी स्वतः उभे राहावे, पण तुमचा मुलगा तिकडे, तुम्ही मुलासाठी फॉर्म भरून घरी बसू नका. पक्षाशी बेईमानी होणार नाही एवढे पथ्य पाळा. बाकी तुम्हाला विरोध करण्याचे कारण नाही. तुम्ही ज्येष्ठ नेते आहात. फक्त एका ऑफिसमध्ये बाप बेटा बसतात, काय करतात हे जनता पाहतेय. मुलगा तिथून उभा राहणार, तुम्ही इथून फक्त फॉर्म भरायचा आणि मुलाला बिनविरोध निवडून द्यायचे, असे कटकारस्थान होता कामा नये, असे कदम म्हणाले होते.
यावर बोलताना किर्तीकर म्हणाले, रामदास कदम यांना गद्दारीचा फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडी गद्दारीची भाषा हास्यास्पद आहे. 1990 साली मी जेव्हा मालाडमधून विधानसभा निवडणुकीसाठी उभा होतो, त्याचवेळेला रामदास कदम खेडमधून निवडणूक लढवत होते. त्यांनी मला पाडण्यासाठी अथक प्रयत्न केले. परंतु, ते यशस्वी झाले नाहीत. खेड ते पुणे असा त्यांनी शरद पवार यांच्या गाडीत बसून प्रवास केला. राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत चर्चा केली होती, असेही किर्तीकरांनी म्हटले आहे.