Download App

शिवसेनेची ‘दक्षिण’ मोहिम : भाजपला 44 वर्षांत जमलं नाही ते शिंदेंना आत्ता जमणार का?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आता दक्षिण भारतात पक्षविस्ताराला सुरुवात केली आहे. शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी नुकताच दक्षिण भारताचा दौरा केला. यावेळी तामिळनाडूतील शिवसेना प्रभारी अँड. राजेश कुमार आणि केरळ राज्यप्रमुख अँड. हरीश कुमार यांच्या उपस्थितीमध्ये तिथल्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज्यस्तरीय बैठक आणि पत्रकार परिषद पार पडली. याबाबत शिवसेनेने ट्विट करुन माहिती दिली. (Shiv Sena Secretary Captain Abhijeet Adsul visited South India recently and held meeting with party workers)

काय म्हंटलं आहे ट्विटमध्ये?

राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आणि शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली तामिळनाडू येथील प्रभारी अँड. राजेश कुमार आणि केरळ राज्यप्रमुख अँड. हरीश कुमार यांच्या समवेत आज तेथील महत्वाच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय बैठक आणि पत्रकार परिषद पार पडली. यावेळी दक्षिण भारतात हिंदुत्ववादी संघटना म्हणून शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रोवण्यासाठी आणि पक्ष बळकटीकरणासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. एकंदरीत राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आल्याची माहिती शिवसेना सचिव कॅ. अभिजित अडसूळ यांनी दिली.

भाजपला 44 वर्षांत जमलं नाही ते शिवसेनेला आत्ता जमणार का?

भाजप मागील जवळपास 4 दशकांपासून दक्षिणेतील राज्यांमध्ये पक्षविस्तार आणि संघटनेच्या मजबुतीसाठी काम करत आहे. मात्र कर्नाटक वगळत भाजपला अद्याप केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये यश मिळालेलं नाही. या राज्यांमधील राजकारणावर तिथल्या प्रादेशिक पक्षांची मजबूत पकड आहे. तामिळनाडूमध्ये 1967 पासून द्रमुक आणि अण्णाद्रमुक आलटून पालटून सत्तेत येत आहेत. तर केरळमध्ये मागील अनेक दशकांपासून काँग्रेस आणि डाव्यांचे प्राबल्य आहे.

आंध्रप्रदेशमध्ये तेलगु देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांची पकड आहे. यातील वायएसआर काँग्रेस सध्या सत्ताधारी पक्ष आहे. तेलंगणामध्ये स्थापनेपासूनच म्हणजे 2014 पासून चंद्रशेखर राव यांच्या आधीच्या तेलंगणा राष्ट्र समिती आणि आताच्या भारत राष्ट्र समितीची सत्ता आहे. कर्नाटकमध्ये केवळ भाजपला जनसमर्थन प्राप्त झाले आहे. मात्र या चार राज्यांमध्ये भाजपला अद्याप यश मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे. अशात शिंदेंच्या शिवसेनेही दक्षिणेची मोहिम हाती घेतली आहे.

Tags

follow us