Download App

“ट्रम्प अन् चीनविरुद्ध बोलण्याची हिंमत मोदींमध्ये नाही”, राऊतांची PM मोदींवर जोरदार टीका

डोनाल्ड ट्रम्प किंवा चीन विरुद्ध बोलण्याची हिंमत मोदींमध्ये नाही. पाकिस्तानला इशारा देणं सोपं आहे. पण पाकिस्तानच्या मागे चीन आहे.

Sanjay Raut Criticized PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) आज देशाच्या स्वातंत्र्यदिनी (Independence Day 2025) लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानला कठोर शब्दांत फटकारले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांच्या टॅरिफ धोरणावरही सडकून टीका केली. तसेच भारत कोणत्याही परिस्थितीत शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हिताशी तडजोड करणार नाही असे सांगितले. त्यांच्या या भाषणावर आता विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. डोनाल्ड ट्रम्प किंवा चीन विरुद्ध बोलण्याची हिंमत मोदींमध्ये नाही अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी आज नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर आणि सरकारच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता 75 वर्षांचे होतील आणि देशाचे स्वातंत्र्य 79 वर्षांचे झाले आहे. या 79 वर्षांत देशाने नक्कीच प्रगती केली आहे. ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा या देशात एक सुई आणि दोरा सुद्धा तयार होत नव्हता. पण आज अनेक बाबतीत देश पुढे गेला आहे.

देशातील युवकांसाठी PM मोदींची मोठी घोषणा; आजपासून प्रधानमंत्री विकसित भारत योजना लागू

त्याचे श्रेय या देशाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व नेत्यांचे आहे. काही लोकांना वाटतं की देश 2014 साली स्वतंत्र झाला. पण खरंतर 2014 नंतर देश खड्ड्यात गेला आहे. भाजपाचे दहा वर्षांतील योगदान हे आहे की हा देश धार्मिक होता तो त्यांनी धर्मांध केला. ही धर्मांधता या देशात जातीय धार्मिक फूट पाडत आहे. ही गोष्ट या देशाच्या स्वातंत्र्याला अत्यंत धोकादायक आहे, अशी जहरी टीका राऊत यांनी केली.

काँग्रेसचं कौतुक अन् मोदींना टोला

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात स्वदेशीचा नारा दिला याबाबत विचारले असता राऊत यांनी काँग्रेसचं कौतुक केलं. राऊत म्हणाले, मोदींनी आधी स्वतःपासून सुरुवात करावी. त्यांनी आता जो स्वदेशीचा नारा दिला आहे तो नारा खरंतर काँग्रेस पक्षाचीच देणगी आहे. काँग्रेसने काय दिले असे त्यांच्याकडून विचारले जाते. स्वदेशीचा नारा महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडीत नेहरू यांनी दिला. म्हणून तर देशात खादी आली. गांधी टोपी आली. आता एक दिवस मोदी सु्द्धा गांधी टोपी घालून भाषण करतील. मोदी आज काँग्रेसवाले झाले आहेत असा खोचक टोला त्यांनी मोदींना लगावला.

मोदींमध्ये तितकी हिंमत नाही

मोदींनी आपल्या भाषणात पाकिस्तानला कठोर शब्दांत फटकारले. डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता टॅरिफवर अमेरिकेला इशारा दिला. यावर बोलताना राऊत म्हणाले, ज्यांनी देश घडवला त्या नेहरूंचंच नाव मोदी घेतात. ट्रम्प किंवा चीनविरुद्ध बोलण्याची हिंमत मोदींमध्ये नाही. ट्रम्प रोज देशाविरोधात बोलतोय. मोदींनाही बोलतोय. त्याचे नाव घ्या. पण मोदी ट्रम्पचे नाव घ्यायला घाबरत आहेत. पाकिस्तानला इशारा देणं सोपं आहे. पण पाकिस्तानच्या मागे चीन आहे. जनरल मुनीरच्या मागे ट्रम्प आहे. लाल किल्ल्यावरून त्यांनी खोटं भाषण करू नये. मोदींनी डोनाल्ड ट्रम्पला सुनावलं पाहिजे आणि चीनला दम दिला पाहिजे असे संजय राऊत यांनी सांगितले.

“स्वातंत्र्य चळवळ अन् आरएसएसचा संबंध काय?, आज देशात”, सपकाळांचा पीएम मोदींना थेट सवाल

follow us