सोलापूर : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ‘भीमा केसरी’ (Bhima Kesari) स्पर्धेत पंजाबच्या एका नामवंत पैलवानाला आस्मान दाखवत सिकंदर शेखने (Sikandar Sheikh) बाजी मारलीय. सिकंदरनं पंजाब केसरी भूपेंद्रसिंहला (Bhupendrasingh) आस्मान दाखवलंय. त्याचबरोबर महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) यानं देखील चांगली कुस्ती करत पंजाबच्या पैलवानाचा पराभव केलाय. या दोन्ही मल्लांनी दमदार कुस्ती केल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र केसरीसारख्याच भव्यपणे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या भीमा केसरी स्पर्धेकडं सिकंदर आणि महेंद्र यांच्या उपस्थितीमुळं अवघ्या महारष्ट्राचं लक्ष लागलं होतं.
यामध्ये शेवटची कुस्ती सिकंदर शेखची होती. पंजाबचा सहा फूट उंच आणि धिप्पाड असा भूपेंद्रसिंह अजनाला याच्याविरुद्ध सिकंदर शेखची कुस्ती होती. भूपेंद्रसिंह आखाड्यात उतारताच उपस्थित सर्वांनाच सिकंदरची काळजी वाटू लागली. सुरुवातीला भूपेंद्रनं सिकंदरवर आघाडी घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर सिकंदरनं आपला ठेवणीतला खेळ सुरु करत डावपेचात टाकत भूपेंद्रला चितपट करत ‘भीमा केसरी’चा मान पटकावलाय.
खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं भीमा केसरी कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. टाकळी सिकंदर येथील कारखान्याच्या मैदानावर मोठा कुस्तीचा आखाडा तयार करण्यात आला. पाच हजारांहून अधिक प्रेक्षक बसू शकतील, अशी भव्य गॅलरी देखील उभारण्यात आली होती. राज्यभरातून जवळपास 400 पेक्षा जास्त पैलवानांनी या स्पर्धेसाठी नावं नोंदवली होती. या कुस्त्यांची 9 लाखांची बक्षिसं आणि चांदीच्या गदा देण्यात आल्या.
महेंद्र गायकवाडची कुस्ती पंजाब युनिव्हर्सिटी चॅम्पियन गोरा अजनाला या दिग्गज पैलवानाशी होती. हे दोन्ही पैलवान मैदानात उतरल्यापासून महेंद्रने आपला नेहमीचा खेळ करण्यास सुरुवात केल्यानं पंजाबच्या गोरा या मल्लानं अनेकदा मैदानातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्या प्रत्येकवेळी महेंद्रने त्याला आखाड्यात ओढले. कुस्ती सुरु होताच महेंद्रने गोराला उचलून चिटपट केलं. त्यानंतर महेंद्रचा विजयी जल्लोष साजरा केला.