SIT formed in the self-proclaimed Captain Ashok Kharat case : स्वघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणात तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन केली असून, या पथकाचे नेतृत्व तेजस्विनी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. सध्या अशोक खरात नाशिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असून न्यायालयाने त्याला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अंकज्योतिषी असल्याचा दावा करत अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप खरात यांच्यवर आहे. या प्रकरणाशी संबंधित तब्बल 58 व्हिडिओ समोर आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक घडामोड समोर आली. क्राईम ब्रँचच्या पथकाने रात्री उशिरा मिरगाव येथील खरात याच्या फार्महाऊसवर अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी अनेक महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यामध्ये खरात यांच्य मालमत्तेशी संबंधित दस्तऐवजांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच फार्महाऊसमधून एक पिस्तूल आणि काही काडतुसे देखील पोलिसांच्या हाती लागली आहेत. यात काही काडतुसे वापरलेली तर काही न वापरलेली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
आमचा केसानं गळा कापला, जिल्हा परिषदेतील सत्तेवरून अब्दुल सत्तारांचा भाजपवर विश्वासघाताचा आरोप
या छाप्यात सापडलेल्या कागदपत्रांचा एसआयटी सखोल अभ्यास करणार आहे. या पुराव्यांमुळे खरात याच्या कारनाम्यांबाबत आणखी महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या गुन्हे शाखेकडून खरात यांची चौकशी सुरू असून त्याच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिक पोलीस दलात देखील खळबळ उडाली आहे. तपास सर्व बाजूंनी व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले असून, खरात याच्याशी संबंधित इतर व्यक्तींवर देखील लक्ष ठेवण्यात येत आहे.
मिरगाव फार्महाऊसवर झालेल्या छाप्यातून मिळालेल्या पुराव्यांमुळे तपासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा परिणाम स्थानिक पातळीवर देखील दिसून येत असून खरात याच्या नावाने सुरू असलेल्या विविध गैरव्यवहारांबाबत आता अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
