‘Sugar Emperor’ Abhijit Patil : राज्यातील नव्याने उदयास आलेले साखरसम्राट म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते अभिजित पाटील हे अल्पावधीतच प्रकाशझोतात आलेले आहे. त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. हे अभिजित पाटील नेमके आहे तरी कोण? आणि त्यांनी एवढ्या अल्पवधीतच इतकं साम्राज्य कसं उभं केलं? हे आपण पाहणार आहोत.
वाळूच्या ठेकेदारीचा व्यवसाय केला सुरू
अभिजित पाटील हे उच्चशिक्षित आहेत. पाटील यांची पंढरपुरातील देगावत वडिलोपार्जित शेती देखील आहे. त्यांनी सुरुवातीला ऊस वाहतुकीच्या ठेकेदारी व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी वाळूच्या ठेकेदारीचा व्यवसाय सुरू केला. मात्र हेच वाळू प्रकरण त्यांना चांगलंच भोवलं. कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अभिजीत पाटलांच्या वाळूतस्करीवर धडक कारवाई केली. मुंढेंनी केलेल्या कारवाईनंतर अभिजीत पाटील यांना तीन महिने तुरुंगवासही झाला. वाळू व्यवसाय भोवू लागल्यांनंतर त्यांनी व्यवसाय क्षेत्रच बदलले.
साखर कारखानदारीमध्ये प्रवेश
वाळू व्यवसाय प्रकरणी जेलमध्ये जाऊन आल्यानंतर पाटील यांनी या व्यवसायाकडे पाठ फिरवत साखर कारखानदारीमध्ये प्रवेश केला. पाटलांनी सुरुवातीला धाराशिव जिल्ह्यातील चोरखळी येथे धाराशिव कारखाना उभा केला व विशेष म्हणजे यामध्ये त्यांना चांगलं यश देखील मिळाले. पहिल्या यशस्वी पाउलानंतर त्यांनी याच क्षेत्रात आणखी क्रांती केली. पाटील यांनी साखर कारखानदारीत आपला यशस्वी ठसा उमटवत धाराशिव पाठोपाठ नांदेड, नाशिक, सांगोला, पंढरपूर या ठिकाणी पाच कारखाने सुरु केले.
अभिजित पाटलांचे साम्राज्य
साखर कारखाना क्षेत्रात अभिजित पाटील हे आज मोठे नाव आहे. ते राज्यातील तब्बल पाच साखर कारखाने चालवत आहेत. यामध्ये धाराशीव साखर कारखाना, धाराशीव साखर कारखाना युनिट २, वसंतदादा साखर कारखाना, सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना व विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर त्यांचं नियंत्रण आहे. यासह डीव्हीपी उद्योग समूहाच्या माध्यमाने मल्टीस्टेट बँकदेखील सुरु केल्या.
राष्ट्रवादीत प्रवेश, भाजपची डोकेदुखी वाढणार
सर्वच पक्षांसोबत चांगले संबंध असलेले अभिजित पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. पवार यांनी अभिजित पाटील यांचे कौतुक करताना नेतृत्व हे तयार करावे लागते. तुम्ही हे नेतृत्व तयार केले आहे. आता फक्त त्याच्या पाठिशी उभे राहा. जेव्हा केव्हा निवडणुका येतील, त्यावेळी राष्ट्रवादीचा आमच्या महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल ते वेळा अभिजित पाटील यांचेच नाव घेतले जाईल, अशी ग्वाहीची पवारांनी दिली आहे. त्यामुळे येत्या विधानसभेला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून अभिजित पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार राहतील हे पक्के झाले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान भाजप आमदार समाधान अवताडे यांना अभिजित पाटील हे चांगली दंड थोपटतील हे नक्कीच.