Supriya Sule clarified her stance : राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा अधूनमधून रंगताना दिसतात. या चर्चांवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकच पक्ष असून त्याची स्थापना शरद पवार यांनी केली आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने हा पक्ष त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आणि त्यांच्यावर अन्याय झाला, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. पक्षाचे संविधान पाहिल्यास ही बाब स्पष्ट होते आणि यासंदर्भातील लढाई सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी एकत्रच आहे, आमचा पक्ष एकत्रच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकच पक्ष आहे. पक्षाचे फाउंडर मेंबर कोण आहेत? पक्षाचा फाउंडर प्रेसिडेंट कोण आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा फाउंडर मेंबर आणि फाउंडर प्रेसिडेंट यांचं नाव शरद पवार आहे. पण चुकीच्या पद्धतीने तो पक्ष त्यांच्याकडून काढून घेण्यात आला. जर तुम्ही पक्षाचे संविधान पाहिले, तर शरद पवारांवर अन्याय झाला आहे आणि ती लढाई सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे. माझी एवढीच मागणी आहे की, अधिकाराने आणि न्यायाने तो पक्ष शरद पवार यांना परत करावा. हा देश कोणाच्या मनमर्जीने चालत नाही, तर तो संविधानाने चालतो. पक्ष परत मिळाल्यानंतर पवार साहेबांनी त्या पक्षाचे काय करायचे, तो निर्णय त्यांनी घ्यावा.
मग त्यांनी तो पक्ष कोणाला द्यावा किंवा नेतृत्व कोणी करावे, हा पूर्णपणे शरद पवारांचा निर्णय असेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पक्षाच्या मालकीसंदर्भातील न्यायालयीन लढाईवर बोलताना सुळे यांनी शरद पवार यांच्यावर झालेला अन्याय भविष्यात दुसऱ्या कोणावरही होऊ नये, यासाठी आपण ही लढाई लढत असल्याचे स्पष्ट केले. मी ही लढाई यासाठी लढते आहे कारण पक्ष ज्यांचा होता, ज्यांनी स्थापन केला, चुकीच्या पद्धतीने संविधानाची चिरफाड करून तो त्यांच्याकडून काढून घेण्यात आला. जो अन्याय शरद पवारांवर झाला, तो पुन्हा दुसऱ्या कोणावर होऊ नये, हाच यामागचा उद्देश आहे. कोणाचीच सत्ता कायमस्वरूपी नसते.
प्रमाणपत्र रद्द करून मराठ्यांच्या उरावर नाचण्याचं काम केलं जातंय, मनोज जरांगेची सरकारवर घणाघाती टीका
मी तुमच्या चॅनेलमध्ये येऊन म्हणाले की या चॅनेलची मालकीण मी आहे, तर तुम्हाला ते चालेल का? तुमचे घर तुमचे आहे, पण तुमच्या घरात येऊन मी खोटी कागदपत्रे दाखवून सातबारावर नाव माझे आहे असे म्हणाले, तर तुम्ही मला घरात राहायला द्याल का? म्हणूनच सुप्रीम कोर्टात आम्हाला लवकरात लवकर तारीख मिळावी, असेही त्यांनी म्हटले. पक्षाच्या संविधानाचे महत्त्व अधोरेखित करताना सुप्रिया सुळे यांनी आमदार किंवा खासदारांची संख्या हा एकमेव निकष नसल्याचा दावा केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे संविधान आहे, त्यानुसार आमदार किंवा खासदार कोणाला मतदान करतात हे महत्त्वाचे नाही. जिल्हाध्यक्ष आणि सर्व कागदपत्रे आहेत. पक्ष कोणाच्या बाजूने आहे याला महत्त्व आहे, निवडून आलेल्या लोकांचे नाही.
निवडून आलेली संख्या कदाचित पवार साहेबांच्या विरोधात गेली असेल, पण पक्ष कागदपत्रांवर पाहिला तर तो शरद पवारांचा कालही होता, आजही आहे आणि उद्या आम्ही त्यांना न्याय मिळवून देणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर थेट भाष्य करताना सुप्रिया सुळे यांनी आधी शरद पवार यांना न्यायाने पक्ष परत मिळणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले असून त्यानंतर पक्षाचे काय करायचे, नेतृत्व कोणाकडे द्यायचे किंवा पुढील राजकीय दिशा काय असावी, याचा निर्णय पूर्णपणे शरद पवार यांचाच असेल, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केल्याच्या मुद्द्यावरूनही सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रात प्रत्येक प्रश्नासाठी उपोषण करण्याची वेळ येत असल्याचा आरोप करत त्यांनी हे राज्य सरकारचे अपयश असल्याचे म्हटले. इथे प्रत्येक गोष्टीसाठी उपोषण करावे लागत आहे. आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी उपोषण, पेपरफुटीसाठी उपोषण, जरांगे पाटीलदेखील उपोषण करत आहेत. उपोषण केल्याशिवाय सरकार ऐकतच नाही, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली.
