Threat to Sushma Andhare : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नागपूर विमानतळावर त्यांना धमकी देण्यात आली. (Sushma Andhare) याबद्दल त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तपास करुन वस्तुस्थिती तपासावी, असं आवाहन सुषमा अंधारे यांनी केलं आहे.
तेरे बिना दिल नही लगता भुजबळांच्या नाराजीवर अजितदादा गटाचं सूचक वक्तव्य
नेमकं काय घडलं?
सुषमा अंधारे या नागपुरात गेल्या होत्या. आज पहाटे त्या नागपूर विमानतळावरुन मुंबईच्या दिशेने निघाल्या. त्याचवेळी विमानतळावर 6 फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला, समोरून अर्धे टक्कल असणारा माणसाने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्या माणसाने जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या, असे सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
सुषमा अंधारेंची पोस्ट
परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सभागृहात आणि बाहेर संघर्ष चालू आहे. अशातच आत्ता 3 वाजून 36 मिनिटांनी नागपूर विमानतळावर (departure gate) ला विचित्र घटना घडली. मी, माझी 7 वर्षांची लेक आणि समता सैनिक दलाच्या ऍड. स्मिता कांबळे यांच्या समवेत होते. साधारण 6 फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला, समोरून अर्धे टक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता. नेहमी प्रमाणे कुणीतरी ओळखीचा असावा म्हणुन वर बघितले तर तो जिवे मारण्याच्या धमक्या देत होता.
गेटवरील सुरक्षा रक्षक थोडे पुढें सरसावले तसा तो जय श्रीराम च्या घोषणा देत भरधाव गाडीने निघून गेला. देवेंद्र जी, आपण आपल्या यंत्रणेकडून या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती तपासावी. हा घटनाक्रम इथे लिहू नये असे खुपदा वाटले. माञ, दहशत आणि दबावतंत्राचे हे गलिच्छ राजकरण मुख्यमंत्री म्हणुन आपल्यापर्यंत पोचवणे ही नागरिक म्हणुन माझी जबाबदारी आहे असे वाटले. #टीप शासनाने मला सुरक्षा पुरवावी असे अजिबात वाटत नाही. कारण त्यावर माझा फारसा विश्वास नाही. बाकी आपली मर्जी, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.