Sushma Andhare On Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर (Pradip Purnekar) हत्या प्रकरणात तपासाला वेग आला आहे. नितेश पवार आणि निखिल यादव या दोन्ही आरोपींना न्यायालयाने 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गोव्याच्या दिशेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. याआधी पप्या शिंदे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणात एकूण पाच आरोपींपैकी आतापर्यंत तिघांना अटक झाली असून, टल्ली नावाचा मुख्य आरोपी आणि आणखी एका आरोपीची ओळख अद्याप पटलेली नसल्याने ते फरार आहेत. निखिल यादवने पूर्णेकर यांच्यावर गोळीबार केल्याचा, तर नितेश पवार ऊर्फ भावड्याने कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केलेत.
“पवार नगर येथे तिघे भेटले, पाच कोटींचा व्यवहार झाला”
सुषमा अंधारे यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी या हत्या प्रकरणाच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत अनेक गंभीर आरोप आणि दावे केले. अंधारे म्हणाल्या की, मीनाक्षी शिंदे, राजा शिंदे आणि टल्ली हे पवार नगर येथे भेटले होते. या व्यक्तींच्या संदर्भातील माहिती पोलिसांनी तपासली पाहिजे. तसेच या प्रकरणात पाच कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.
अंधारे यांनी सांगितलं की, प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत. कडवट शिवसैनिक असलेलं पूर्णेकर कुटुंब एकटं नाही, आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. हे नुकसान केवळ कुटुंबाचं नसून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचंही नुकसान आहे. दोन आरोपींना अटक झाली आहे, मात्र अजूनही काही आरोपी बाहेर आहेत. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अद्याप अटक झालेली नाही, असा दावा त्यांनी केला.
‘आनंद दिघेंच्या ठाण्यात हे काय चाललंय?’
ठाणे हे आनंद दिघे यांचं ठाणे म्हणून ओळखलं जातं. मात्र, धर्मवीरांच्या आश्रमात त्यांच्या गटातील लोक दारू पिऊन धिंगाणा करण्यापर्यंत मजल जाते, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. रामने पहिल्याच दिवशी दिलेल्या जबाबात मीनाक्षी शिंदे यांचं नाव स्पष्टपणे घेतलं असल्याचंही त्या म्हणाल्या.
‘वाल्मिक कराड जेलमधून सूत्रे हलवतोय’; बजरंग सोनवणेंच्या आरोपानंतर बीडच्या कारागृहाची झडती!
क्लस्टरच्या मुद्द्यावरून प्रदीप पूर्णेकर लढत होते. मीनाक्षी शिंदे या मूळच्या कर्नाटकच्या असून, त्यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्रावर पूर्णेकर यांनी आक्षेप घेतला होता, असं अंधारे यांनी सांगितलं. मीनाक्षी शिंदे यांनी संबंधित ऑडिओ AIचा असल्याचं म्हटलं आहे. मग हा ऑडिओ AI-निर्मित असल्याचा दावा असेल तर आठ महिन्यांपूर्वी सायबर पोलिसांकडे तक्रार का केली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुर्णेकरांची हत्या होण्याच्या सुमारे 15 दिवस आधीपासून पूर्णेकर यांची रेकी सुरू होती, असा दावाही अंधारे यांनी केला. त्यामुळे हॉटेल महाराजा येथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासावं, अशी मागणी त्यांनी केली.
“मीनाक्षी शिंदे पत्रकार परिषद घेतात अन् पोलीस बघत बसतात”
क्लस्टरच्या कामात गरीब आणि सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळावं, त्यासाठी कुणालाही एक रुपया खाऊ देणार नाही, या भूमिकेतून प्रदीप पूर्णेकर लढत होते, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ-व्हिडीओ आणि माहिती समोर आणूनही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
‘302’च्या एफआयआरमध्ये नाव असलेल्या मीनाक्षी शिंदे पत्रकार परिषद घेत आहेत, मात्र पोलिस त्यांना ताब्यात घेत नाहीत, असा सवाल अंधारे यांनी केला. मीनाक्षी शिंदे स्वतःचा काही दोष नसल्याचं सांगत आहेत, याचाही त्यांनी उल्लेख केला.
मुंबईतील मोहरम मिरवणुकीत विषारी कॅप्सूल वाटल्याचा आरोप, फैयाज प्रेमजीविरोधात 700 पानी चार्जशीट
मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या दोन्ही मुलींना परदेशात का पाठवलं, असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. मीनाक्षी शिंदे उजळ माथ्याने पत्रकार परिषद घेण्याचं धाडस करत आहेत, तर पोलीस दात नसलेल्या वाघासारखे का बघत बसले आहेत, असा सवाल त्यांनी केला.
या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकमेकांशी असलेले CDR तपासले पाहिजेत, अशी मागणी अंधारे यांनी केली. तसेच मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत आपण लढत राहणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
