Sushma Andhare’s sensational allegations against Rupali Chakankar : नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेल्या अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांप्रकरणी अटक झाल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला आता स्पष्टपणे राजकीय वळण मिळताना दिसत असून, विविध नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत वाद निर्माण झाला आहे. अशोक खरात यांची पाद्यपूजा केल्याचा कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
या प्रकरणात शिवसेना (उबाठा) च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला की, 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावास्येच्या दिवशी चाकणकर यांनी स्वतःची अनामिकाकापून तंत्रमंत्र साधना केल्याचा आरोप एका पीडित महिलेने केला आहे. तसेच, चाकणकर यांना खरात यांच्या सर्व कथित गुन्ह्यांची माहिती होती, असा दावा करत त्यांनी तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
अंधारे यांनी पुढे म्हटले की, या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईचे कौतुक केले पाहिजे. मात्र, या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे फुटी आणि व्हिडिओ समोर येत असून, यामागील बेनामी संपत्ती आणि इतर आर्थिक व्यवहारांची चौकशी होणे आवश्यक आहे, असे देखील त्यांनी सांगितले.
तसेच पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार, तंत्रमंत्र आणि अघोरी प्रथांमध्ये काही प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. खरात यांच्या नातेवाईकांचा चाकणकर यांच्या घराशी संबंध असल्याचा देखील दावा त्यांनी केला आहे.
रुपाली चाकणकर यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले असून, आपला संबंध केवळ एका ट्रस्टपुरता मर्यादित असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या तंत्रमंत्राशी संबंध नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्या अनामिकेला बँडेज लावलेला फोटो दाखवत, त्या तंत्रमंत्र करत असल्याचा पुनरुच्चार केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून चाकणकर यांची नार्को चाचणी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
याशिवाय, चाकणकर आणि अशोक खरात यांच्यातील संपर्काचा तपास करण्यासाठी कॉल डिटेल रेकॉर्ड तपासण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. संभाव्य पुरावे नष्ट होऊ नयेत आणि आरोपी फरार होऊ नयेत, यासाठी चाकणकर यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. सध्या या प्रकरणामुळे सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर पातळीवर मोठी चर्चा सुरू असून, पुढील तपासात कोणते नवे खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
