मोठेमोठे गार केले गंमतमधी; चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर सुषमा अंधारेंचं व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत

जर चाकणकरांना स्वेच्छेने राजीनामा द्यायचा असता, तर हे प्रकरण वर्षभरापूर्वी त्यांच्या कानावर आले, तेव्हाच त्यांनी तो दिला असता.

Untitled Design 67

Untitled Design 67

Sushma Andhare’s WhatsApp status is in the news after Chakankar’s resignation : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचे राजकीय पडसाद देखील उमटू लागले आहेत. या प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मंत्र-तंत्राच्या नावाखाली महिलांना संमोहित करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरातच्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत हल्लाबोल केला असून या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर देखील सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका सुरूच ठेवली आहे. फेसबुक पोस्ट आणि व्हाट्सअँप स्टेटसद्वारे त्यांनी चाकणकरांना पुन्हा एकदा डिवचले आहे.

फेसबुक पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांनी चाकणकरांवर जोरदार टीका करत म्हटले आहे की, जर चाकणकरांना स्वेच्छेने राजीनामा द्यायचा असता, तर हे प्रकरण वर्षभरापूर्वी त्यांच्या कानावर आले, तेव्हाच त्यांनी तो दिला असता. किमान तीन दिवस आधी तरी त्यांनी राजीनामा दिला असता. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत पद वाचवण्यासाठी धडपड करत होत्या. खरातची अटक झाल्यानंतर लगेच त्यांनी पद सोडले असते, तर त्यात नैतिकतेचा काही अंश दिसला असता. त्यामुळे हा राजीनामा नसून ही हकालपट्टी असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

इतकंच नव्हे तर नुसता राजीनामा देऊन चालणार नाही, तर रुपाली चाकणकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी करण्यात यावे आणि त्यांची अटक व्हावी, अशी मागणी देखील सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये केली आहे. याशिवाय सुषमा अंधारे यांनी आपल्या व्हाट्सअँप स्टेटसवर देखील प्रतिक्रिया देत, मोठमोठे गार केले गंमतमधी, असे लिहिले आहे. चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या या पोस्ट आणि स्टेटसची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, नेमके प्रकरण काय याबाबत बोलायचे झाले, तर अशोक खरात याच्याविरोधात नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत १८ मार्च रोजी पहाटे तीनच्या सुमारास गुन्हे शाखेकडून अशोक खरातला ताब्यात घेतले.

अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मोरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असून तो मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांत तो कोस्मोलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला होता. अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अत्याचाराच्या आरोपाखाली त्याला अटक झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचे राजकीय पडसाद देखील उमटू लागले आहेत.

Exit mobile version