Download App

आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी; 2 दिवसांपूर्वीच घेतली होती फडणवीस-बावनकुळेंची भेट

नागपूर : काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. देशमुख यांचं ६ वर्षासाठी काँग्रेस पक्षामधून निलंबन करण्यात आलं आहे. पक्षातील नेत्यांविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी शिस्तपालन समितीकडून चौकशी होईपर्यंत देशमुख यांचं निलंबन करण्यात आलं होतं. आता त्यांचे ६ वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. (Suspended Congress leader Ashish Deshmukh has been expelled from the party)

मागील काही दिवसांपासून आशिष देशमुख हे सातत्याने पक्षविरोधी वक्तव्य करत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर विनाकारण आरोप केले जात आहे. असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले होते. सातत्याने पक्षविरोधी विधाने करणाऱ्या देशमुखांची वरिष्ठ नेते योग्य ती दखल घेतील, असे देखील लोंढे यांनी सांगितले होते. आता देशमुख यांचे ६ वर्षांसाठी निलबंन करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे भाजपला पाठिंबा देणार; आशिष देशमुखांचं मोठं विधान

काय म्हटलं आहे आदेशात?

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने दि. ०५ मार्च २०२३ रोजीच्या पाठविलेल्या कारणे दाखवा नोटीसला दिनांक ०९ एप्रिल २०२३ रोजीच्या आपल्यामार्फत मिळालेल्या उत्तरावर समितीने चर्चा केली आहे.

आपण आपल्या पक्षविरोधी वर्तनाबद्दल व जाहीर वक्तव्याबद्दल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्वे या प्रकरणात लागू होतात.

आपण केलेल्या पक्षविरोधी वक्तव्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने तुम्हाला भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांच्या कालावधीसाठी निष्कासन करण्याचा निर्णय घेतला आहे.

या आदेशाद्वारे पक्षविरोधी कारवायांकरीता आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरुन पुढील सहा वर्षाकरिता तात्काळ निष्कासित करण्यात येत आहे.

आशिष देशमुख यांनी काय म्हंटले होते?

नाना पटोले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एक खोका दिला जात आहे, असा आरोप आशिष देशमुख यांनी होता. त्यानंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शिस्तपालन समितीच बैठक पार पडली. या बैठकीत आशिष देशमुख यांच्यावर चौकशी होईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

देशमुख-पटोले वाद :

मागील अनेक दिवसांपासून राज्यात आशिष देशमुख विरुद्ध पटोले असा वाद रंगला आहे. देशमुख यांनी सातत्याने पटोले यांच्यावर निशाणा साधत राज्यातील काँग्रेसच्या दुरावस्थेला पटोलेच जबाबदार असल्याचे म्हटले होते. विधान परिषद निवडणूक, महाविकास आघाडी सरकार, विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा या आणि इतर मुद्द्यांवरुन देशमुख यांनी पटोलेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहिले होते. तसंच माझ्या अगोदर पक्षाने कारणे दाखवा नोटीस नाना पटोले यांना दिली पहिजे, असेही त्यांनी म्हटले होते.

फडणवीस-बावनकुळे भेट :

आशिष देशमुख यांनी २ दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आशिष देशमुख यांचे भाजपमध्ये पुनरागमन होणार का? या चर्चांना जोरदार सुरुवात झाली आहे. यावेळी फडणवीस आणि बावनकुळे यांच्यासाठी देशमुख यांनी नाष्ट्याचा खास बेत आखला होता. दरम्यान, या भेटीवर प्रतिक्रिया देताना, आशिष देशमुख यांनी मला बऱ्याच दिवसांपासून नाष्ट्याला बोलावलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे नाष्ट्यासाठी गेलो होतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते,

Tags

follow us