सीएमआरच्या चार्टर विमानात अचानक तांत्रिक अडचण; सुनेत्रा पवारांचा दिल्ली प्रवास उशिरा, सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित

दिल्लीकडे रवाना होण्यासाठी मुंबई विमानतळावरून उड्डाण करण्याच्या तयारीत असताना त्यांच्या चार्टर विमानात अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला.

Untitled Design 73

Untitled Design 73

Technical snag in Sunetra Pawar’s aircraft : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान एक महत्वाची घटना घडली. दिल्लीकडे रवाना होण्यासाठी मुंबई विमानतळावरून उड्डाण करण्याच्या तयारीत असताना त्यांच्या चार्टर विमानात अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला. या अनपेक्षित बिघाडामुळे सुनेत्रा पवार यांना विमानतळावर जवळपास 45 मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. तांत्रिक पथकाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतल्यानंतर विमानाला उड्डाणासाठी परवानगी मिळाली आणि त्यानंतर त्यांच्या दिल्लीचा प्रवास सुरू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली दौऱ्यासाठी सुनेत्रा पवार यांनी जाण्या-येण्यासाठी सीएमआर कंपनीच्या विशेष चार्टर विमानाची निवड केली होती. ही कंपनी आंध्र प्रदेशातील भाजप खासदार सी. एम. रमेश यांच्या मालकीची असल्याचे सांगितले जात आहे. याच विमानातून उड्डाणापूर्वी तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने काही काळ विमानतळावरील यंत्रणांची धावपळ उडाली. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण केल्यानंतरच विमानाला पुढील प्रवासातही हिरवा कंदील देण्यात आला.

उदय सामंतांच्या मिशनला यश, आठ दिवसांच्या मनधरणीनंतर गोकुळ गितेंचे बंड थंड, नरेंद्र दराडेंचा मार्ग मोकळा

दरम्यान, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणखी एका गोष्टीची चर्चा रंगली आहे. एका बाजूला सुनेत्रा पवार यांनी दिल्ली दौऱ्यासाठी विशेष चार्टर विमानाचा वापर केला, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली प्रवासासाठी नियमित व्यावसायिक विमानसेवा निवडली. फडणवीस हे इंडिगोच्या विमानाने सामान्य प्रवाशांप्रमाणे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

राजकीय नेत्यांच्या प्रवासशैलीतील हा विरोधाभास चर्चेचा विषय ठरत असून सोशल मीडियावर देखील याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. चार्टर विमानातील तांत्रिक बिघाडामुळे सुरक्षेविषयीचे बरेच प्रश्न देखिव उपस्थित केले जात आहेत. मात्र, संबंधित यंत्रणांनी वेळेत हस्तक्षेप करून बिघाड दूर केल्याने कोणतीही मोठी दुर्घटना टळली आणि संपूर्ण प्रवास सुरक्षितपणे पार पडला.

दिल्लीतील बैठका आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात असतानाच, चार्टर विमानातील तांत्रिक बिघाड आणि त्यानंतर रंगलेली राजकीय चर्चा राज्याच्या राजकारणात नवीन चर्चांना तोंड फोडणारी ठरत आहे.

Exit mobile version