Thackeray Vs Shinde : राज्यातील शिवसेनेतील वाद दिवसेंदिवस नव्याने समोर येत आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राज्यभरात उद्धव ठाकरे गटाकडून शिवगर्जना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेतून ठाकरे गटाचे नेते शिवसेना नेत्यांवर आगपाखड करत आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता शिवसेना (शिंदे गट) राज्यभरात शिवधनुष्य यात्रा काढणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे अस वातावरण तयार होणार आहे.
ठाकरे गटाची २५ फेब्रुवारीपासून राज्यभरात शिवगर्जना आणि शिवसंवाद अभियान सुरु झाले आहे. २५ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान हे अभियान सुरु राहणार आहे. शिवगर्जना अभियानामार्फत राज्यभरात पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राज्याच्या विविध भागांचा दौरा करणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे
हेही वाचा : उद्धव ठाकरेंकडे राहिलेत चार कुत्रे त्यापैकी तू.. चिडलेल्या राणेंची जाधवांवर जहरी टीका
शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगने दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेला धनुष्यबाण त्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेणार आहे. त्यासाठी राज्यभर यात्रा करणार आहेत.
यात्रा सुरु करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील नेते मार्च अखेरीस अयोध्यावारी करणार आहेत. त्यासाठी शिवसेना शिंदे गटाची आखणी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. अयोध्येतून धनुष्यबाण आणून तो यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवणार आहे. ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान, माझा धनुष्यबाण’ असे या यात्रेचे घोषवाक्य असणार आहे.