The accused’s language changed after interrogation : नाशिकमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाच्या अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकरणात अटकेत असलेला कथित पत्रकार रवींद्र एरंडे याचंही पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून, या तपासातून अनेक भयावह बाबी समोर येत आहेत. गोरगरीब आणि गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एरंडेने त्या कृत्यांचे शंभरपेक्षा अधिक व्हिडिओ तयार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
गुरुवारी नाशिक पोलिसांनी एरंडेची आपल्या खास पद्धतीने चौकशी केली. सुरूवातीला तो तपासात सहकार्य करत नव्हता, मात्र पोलिसांनी कडक भूमिका घेतल्यानंतर त्याची भाषा बदलली. चौकशीनंतर क्राईम ब्रांचच्या कार्यालयातून बाहेर पडताना एरंडे लंगडत चालताना दिसून आला. यावेळी त्याने हात जोडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे वाक्य उच्चारल्याचे पाहायला मिळाले. अलीकडच्या काळात गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी नाशिक पोलिसांनी हा वेगळा पॅटर्न अवलंबला असल्याची चर्चा आहे.
याआधी देखील अशाच प्रकारे भोंदू अशोक खरात याची पोलिसांनी चौकशी केली होती. सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या खरातला देखील धडा शिकवल्यानंतर तो देखील बाहेर पडताना अशाच अवस्थेत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणताना दिसला होता. आता एरंडेच्या बाबतीत देखील तसाच प्रकार घडल्याचे बोललेले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची उकल देखील अत्यंत नाट्यमयरित्या झाली. काही दिवसांपूर्वी एरंडेने स्वतः सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, काही जण त्याचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी मागत आहेत. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून चार जणांना अटक केली, मात्र पुढील तपासात पोलिसांच्या हाती धक्कादायक पुरावे लागले. एरंडेच्या टॅबमध्ये तब्बल 87 अश्लील व्हिडिओ आढळून आले. त्याच्याकडून चार मोबाईल, दोन पेन ड्राइव्ह आणि एक मेमरी कार्ड जप्त करण्यात आले असून, त्याच्या कार्यालयावर छापा टाकून महत्वाची कागदपत्रे देखील ताब्यात घेण्यात आली आहेत.
तसेच, जप्त करण्यात आलेल्या उपकरणांमधील दिलीत केलेला डेटा सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पुन्हा मिळवण्याचे काम सुरू आहे. तपासात असे देखील समोर आले आहे की, आरोपीने अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांचे शोषण केले होते. या प्रकरणाचा तपास अधिक खोलात सुरू असून, आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
