अहमदनगर : सोयरीकीचं राजकारण म्हंटल की, महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्याचं नाव अपसुक येतं. एकेकाळी राजकारणात गडाख आणि घुले परिवाराचा राजकीय संघर्ष होता. आता नगर जिल्ह्यातील हे दोन नेते आता एकमेकांचे व्याही झालेत. ज्येष्ठ नेते यशंवराव गडाख यांचे नातू आणि शिवसेनेचे माजीमंत्री शंकरराव गडाख (MLAShankharrao Gadakh) यांचे सुपुत्र उदयन गडाख (Udayan Gadakh) आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले (Chandrashekhar ghule) यांची मुलगी डॉ. निवेदिता घुले (nivedita ghule) यांचा शाही विवाह सोहळा पार पडला.
नेवासे तालुक्यातील यशवंत कॉलनीमध्ये थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडलाय. विशेष म्हणजे या सोहळ्याला राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीय. राजकारणी नेत्यांच्या उपस्थितीसाठी आज नेवासे तालुक्यात हेलिपॅड उभारण्यात आलं होतं. हेलिकॉप्टरने अनेक नेत्यांनी विवाहाला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालंय.
गडाख आणि घुले सोयरीक जुळणार असल्याचं राजकीय वर्तुळात या विवाह सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली होती. अगदी लग्न ठरल्यापासून जिल्ह्यात गडाख-घुले विवाह सोहळ्याची मोठी चर्चा होत आहे. या विवाह सोहळ्याला मोठा लवाजमा आपल्याला मिळालायं. विवाह सोहळ्यासाठी सर्वपक्षीय दिग्गज राजकीय नेत्यांची हजेरी पाहायला मिळत आहे. या विवाह सोहळ्यात आमदार शंकरराव गडाख विवाह सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्याचे मोठ्या अदबीने हात जोडून स्वागत करताना दिसून आले आहेत.
या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, डॉ. हर्षवर्धन पाटील, बबन पाचपुते, मिलिंद नार्वेकर,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार अंबादास दानवे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार आशुतोष काळे आमदार मोनका राजळे यांची विशेष उपस्थिती होती.
एकीकडे आमदार आशुतोष काळे चंद्रशेखर घुले यांचे मोठे जावई आहेत. आता दुसरे जावई उदयन गडाख होणार आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये सोयरिक होत असल्याने आगामी निवडणुकीत वेगळं चित्र दिसणार असल्याची चर्चा रंगणार आहे. सोयरिकीची बांधलेली मोट पुढील काळात राजकारणाची दिशा बदलणार असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा होत असल्याचं दिसून येतंय.
दरम्यान, आमदार शंकराव गडाख आणि चंद्रशेखर घुले यांचे विधानसभा मतदारसंघ शेजारी-शेजारी आहेत. महाविकास आघाडीमुळे दोन्ही दिग्गज कुटुंब आता एकत्र आल्याने या सोयरिकीची रणनीती आगामी निवडणुकांमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे, असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही.