Download App

बागेश्वर बाबावर देहू संस्थानच्या विश्वस्तांची कृपा…

पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मध्य प्रदेशातल्या बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराजांना (Bageshwar Baba) आम्ही माफ करत असल्याचं स्पष्टीकरण देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी दिलंय. या प्रकरणी देहू संस्थानच्या विश्वस्तांनी कृपा करत त्यांना माफ केलंय.

मोरे म्हणाले, संत तुकाराम महाराजांच्या पत्नी आमच्या मातोश्री आहेत. ज्यांनी तुकोबारायांना घास घातल्याशिवाय अन्नाचा कन घेतला नाही. तुकाराम महाराजांसाठी ज्यांनी आयुष्यभर त्यागाची भूमिका घेतली, त्यांच्याबद्दल असं विधान चुकीचं असल्याचं त्यांनी म्हंटलयं.

तसेच संत तुकाराम महाराजांबाबत ऐकीव माहितीद्वारे असं चुकीचं वक्तव्य करु नये, वारकरी सांप्रदाय हा सहिष्णू आहे. आम्हीही त्यांना माफ करत असल्याचं विश्वस्त माणिक मोरे यांनी स्पष्ट केलंय.

बागेश्वर बाबा नेमकं काय म्हंटले?
संत तुकाराम महाराजांना त्यांच्या पत्नी रोज मारत असत. त्यांना रोज काठीने मारत होते. त्यावेळी त्यांना कोणीतरी विचारले तुम्हाला पत्नी मारते, तुम्हाला काहीच वाटत नाही का? तर तुकाराम महाराज म्हणाले, देवाची कृपा आहे की, मला मारणारी पत्नी मिळाली. प्रेम करणारी पत्नी मिळाली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. पत्नीच्या चक्करमध्ये पडलो असतो. पण मारणारी पत्नी मिळाली तर मला संधी मिळाली देवावर प्रेम करण्याची, असं विधान त्यांनी केलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर महाराज चर्चेत आहेत. नूकताच त्यांनी नागपूरमध्ये एक कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमादरम्यान भक्तांच्या समस्यांचं निवारण करत असल्याचं चित्र दिसून आलं. मात्र, यावेळी भक्तांच्या मनातलं ओळखून ते समाधान सांगत असल्याची माहिती समोर आली होती.

त्यावर अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी आक्षेप घेत बागेश्वर बाबा अंधश्रध्दा पसरवत असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांच्या तपासानंतर बागेश्वर महाराजांनी क्लीनचीटदेखील मिळाली होती.

त्यानंतर लगेचच त्यांनी तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते पुन्हा चर्चेत आले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातील राजकीय नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, अशातच देहू संस्थानचे विश्वस्त माणिक मोरे यांनी बागेश्वर महारांजना आम्ही माफ केल्याचं स्पष्ट केलंय.

Tags

follow us