The issue of women’s safety is on the agenda again in Nashik : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाच्या धक्कादायक प्रकरणाने शहरचं नव्हे तर संपूर्ण राज्य हादरले आहे. भोंदू प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच, त्याच धर्तीवर घडलेला हा प्रकार समोर आल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सातपूर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणात स्वतःला पत्रकार आणि लघुउद्योजक सल्लागार म्हणवणाऱ्या 63 वर्षीय रवींद्र गणपत एरंडे याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्याच्याकडून 12 लाख रुपयांची खंडणी मागितली जात असल्याचा दावा त्याने केला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ब्लॅकमेल करणाऱ्या चौघांना अटक केली सुरूवातीला हे प्रकरण केवळ खंडणी आणि चोरीपुरते मर्यादित असल्याचे वाटत होते. मात्र तपास जसजसा पुढे गेला, तसतसे यामागचे भयानक वास्तव उघडकीस आले.
तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या टॅब, हार्डडिस्क आणि इतर डिजिटल उपकरणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सापडलेली माहिती पाहून तपास अधिकाऱ्यांना देखील धक्का बसला. या व्यक्तीने गेल्या अनेक वर्षांपासून महिलांचे पद्धतशीर लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले. उद्योग उभारणीसाठी मदत कारण्याचे आमिष दाखवत तो महिलांना आपल्या कार्यालयात बोलवत असे. त्यांच्या आर्थिक आणि वैयक्तिक अडचणींचा गैरफायदा घेत तो त्यांच्यावर अत्याचार करत असे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे, या सर्व प्रकारांचे त्याने छुप्या कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण केले होते. कार्यालयात गुप्तपणे बसवलेल्या कॅमेऱ्यांमधून हे व्हिडिओ रेकॉर्ड केले जात होते. हे व्हिडिओ त्याने टॅब, हार्डडिस्क आणि इतर डिजिटल माध्यमांमध्ये साठवून ठेवले होते. हे कृत्य केवळ गुन्हेगारी नसून अत्यंत अमानुष असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणाला वळण मिळालं ते त्याच्याकडे काम करणाऱ्या ऑफिसबॉयमुळे. त्याने संबंधित व्यक्तीला टॅब आणि हार्डडिस्क चोरली. त्यामधील 100 हुन अधिक अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याने आपल्या तीन साथीदारांसह तक्रारदारालाच ब्लॅकमेल करण्याचा कट रचला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी 12 लाख रुपयांची मागणी केली. सुरूवातीला तक्ररदाराने 10 हजार रुपये दिले, मात्र त्यानंतर मागणी वाढत गेल्याने तो स्वतःच पोलिसांकडे गेला.
मात्र, पोलीस तपासात उलट फिर्यादीच आरोपी ठरला. 2003 ते 2024 या कालावधीत तब्बल 121 हुन अधिक महिलांचे अश्लील व्हिडिओ तयार केल्याचे समोर आले आहे. या सर्व महिलांपैकी अनेकांनी भीतीपोटी तक्रार नोंदवली नसण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पीडितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकरणात पोलिसांनी संबंधित व्यक्तीला देखील अटक केली असून, त्याच्यावर अत्याचार, लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ब्लॅकमेल करणाऱ्या चौघांविरोधात खंडणी, धमकी आणि चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून हार्डडिस्क, पेनड्राइव्ह आणि मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन करण्याचा विचार सुरू केला असल्याची माहिती समोर येत आहे. या माध्यमातून सर्व व्हिडिओंची सखोल तपासणी करून पीडित महिलांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. पोलिसांनी सर्व पीडित महिलांना पुढं येण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या ओळखीची पूर्ण गोपनीयता राखली जाईल, तसेच त्यांना कायदेशीर आणि मानसिक आधार दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. सामाजिक संस्थांनी देखील या प्रकरणात पुढाकार घेत पीडितांना मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.
या घटनेमुळे नाशिकमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे. खरात पार्ट 2 अशी चर्चा रंगत असताना, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलण्याची गरज अधोरेखित होत आहे.
