Shivaji University Name Extension : शिवाजी विद्यापीठ असा एकमुखी नारा देत विद्यापीठाच्या नामविस्ताराला आज अधिसभा (सिनेट) सदस्यांनी जोरदार विरोध दर्शविला. शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम रहावे, या मागणीचा स्थगन प्रस्ताव प्रशासनाने स्वीकारून ठराव करावा, यासाठी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झालं. (Shivaji University) त्यावर तब्बल पाऊण तास घमासान झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी नामविस्तारासंबंधीचा स्थगन प्रस्ताव स्वीकारल्याचे सांगितल्यानंतर वातावरण निवळले आणि सभेचे पुढील कामकाज सुरू झालं.
पुणे, मुंबई अन् कोकण कृषी विद्यापीठाला मिळाले नवीन कुलगुरु; कोण आहेत, वाचा सविस्तर
विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात सकाळी दहा वाजता अधिसभा सुरू झाली. त्यात प्रारंभी अॅड. अभिषेक मिठारी यांनी शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम रहावे, या मागणीचा आणि छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊसाहेब, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्या सर्व व्यक्तींचा निषेध करत असल्याचा स्थगन प्रस्ताव मांडला. त्याबाबतचा ठराव करण्याची मागणीही केली. त्याला सर्व सदस्यांनी एकमुखाने पाठिंबा दिला. त्यावर कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सन्माननीय सदस्यांचे म्हणणे स्वीकारतो आणि संबंधित विषय संवेदनशील असून, मी तुमच्याबरोबर आहे.
शाहू सेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा
या नामविस्ताराच्या विरोधातील स्थगन प्रस्ताव कुलगुरूंनी स्वीकारला आहे. त्याच्यावर राज्यपालांनी १८ मार्चपर्यंत शिक्कामोर्तब करावे; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शाहू सेनेचे शुभम शिरहट्टी यांनी दिला. अधिसभेवेळीच त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये येत आपली भूमिका मांडली. यापूर्वी काही मंडळींनी अधिसभेत घुसण्याचा प्रयत्न केला होता. आजसुद्धा अशाच पद्धतीने काही लोक घुसण्याचा प्रयत्न करणार होते म्हणून आम्ही आलो असल्याचे शिरहट्टी यांनी सांगितले. यावेळी सारंग पाटील, करण कवठेकर, शशिकांत सोनुले, अथर्व चौगुले, स्वराज भाट आदी उपस्थित होते.
नामविस्ताराचा प्रयत्न करणाऱ्यांचा निषेध
ज्यांना छत्रपती शिवरायांचे नाव खुपते, अशा प्रवृत्तींकडून नामविस्ताराचा प्रयत्न सुरू असून, आम्ही त्याचा निषेध करतो. नामविस्तारातील धोके सर्वांनी लक्षात घ्यावेत. या नामविस्ताराविरोधात आम्ही तीव्र लढा देणार असल्याचे ॲड. मिठारी, श्वेता परुळेकर आणि इतर सदस्यांनी सांगितले.