Download App

NCP : अजित पवार गटाचा ‘आवाज बंद’ : ‘X’ अकाऊंट सस्पेंड; नेमकं काय कारण?

मुंबई : राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे एक्स (ट्विटर) अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे. एक्सचे नियम न पाळल्याचा ठपका ठेवत बे अकाऊंट निलंबित केले आहे. मात्र शरद पवार यांच्या गटाकडून या अकाऊंटबाबत तक्रार करण्यात आली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. यातून एकप्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला शरद पवार गटाने धक्का दिल्याची चर्चा आहे. (The X account of the NCP Ajit Pawar group has been suspended)

राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवार यांच्या गटाने त्यांची भूमिका मांडण्यासाठी नवीन एक्स अकाऊंट सुरु केले होते. यावरुन कार्यक्रमांची, दौऱ्यांची माहिती, सभा आणि पत्रकार परिषदेतील मुद्दे, व्हिडीओ, फोटो या देण्यात येत होते. व्हेरिफाईड अकाऊंट आणि 1768 फॉलोअर्स झाले होते. शरद पवार गटावर अनेकदा टीकाही करण्यात आली होती.

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर स्वबळावर मुख्यमंत्री न होऊ शकल्याची टीका केली होती. त्यानंतर वळसे पाटलांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. मात्र अजित पवार यांच्या गटाकडून या एक्स अकाऊंटच्या माध्यमातून आक्रमक भूमिका मांडत वळसे पाटलांना दुजोरा दिला होता. त्यावेळी हे अकाऊंट मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. मात्र यानंतर शरद पवार गटाकडून या एक्स हँडलविरोधात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर हे अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे.

Tags

follow us