The young woman’s deal was made right at the police station : पुण्यातील बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर हालचालींवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मध्यरात्री व्यापक कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या धडक कारवाईत एकूण 41 इमारतींची झडती घेण्यात आली, तर शेकडो महिला आणि पुरुषांची तपासणी करण्यात आली. कारवाईदरम्यान दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले असून काही अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. तसेच अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली.
बुधवार पेठ परिसरात काही बांगलादेशी महिला आणि अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईमागे आणखी एक गंभीर पार्श्वभूमी समोर आली आहे. मदतीसाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका तरुणीचा तेथेच सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. संबंधित तरुणीला मदत करण्याऐवजी तिला पुन्हा वेश्याव्यवसायात ढकलण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात शुक्रवार पेठेतील पोलीस चौकीतील एका महिला पोलीस हवालदाराचा सहभाग समोर आल्याने तिला निलंबित करण्यात आले आहे.
महिला हवालदारच तरुणींचा सौदा करत असल्याच्या आरोपामुळे पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. केवळ एका कर्मचाऱ्यावर कारवाई करून प्रकरण थांबवले जाईल का, की तिच्यामागील संभाव्य साखळीचाही तपास होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवार पेठेत कोम्बिंग ऑपरेशन राबवले असले तरी, ही कारवाई केवळ दिखावा तर नाही ना, अशीही चर्चा सुरू आहे.
जलद नफ्याच्या अमिषामागे फसवणुकीचा डाव? अजित पवारांच्या नावाचा वापर करून नवा स्कॅम
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा आणि परिमंडळ एक अंतर्गत मंगळवारी (ता. 10) ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईसाठी सहा पोलिस उपायुक्त, आठ सहाय्यक आयुक्त, 19 पोलिस निरीक्षक, 55 सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक तसेच सुमारे 375 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. कारवाईदरम्यान 41 इमारतींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 426 महिला आणि 290 पुरुषांची चौकशी करण्यात आली. तसेच पाच ठिकाणी नाकाबंदी करून 459 पुरुष आणि 32 वाहनांची तपासणी करण्यात आली.
नाकाबंदी दरम्यान रामेश्वर बिभीषण बिराजदार (वय 31, रा. बाजीराव रस्ता; मूळ रा. तांबरवाडी, ता. औसा, जि. लातूर) याच्या ताब्यातून सात ग्रॅम चरस आणि तीन इंजेक्शन जप्त करण्यात आले. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय दोन संशयित बांगलादेशी महिलांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याबाबत पुढील चौकशी सुरू आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे आणि परिमंडळ एकचे उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक पोलिस ठाण्यांतील अधिकारी आणि गुन्हे शाखेची पथके यामध्ये सहभागी झाली होती. अशा प्रकारच्या धडक कारवाया पुढेही सुरू राहतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पोलिस यंत्रणेतील कथित सहभागामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे आणि या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
