Commissioner Tukaram Mundhe On FDA Action : अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यभरात कारवाईचा धडाका सुरु आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या नेतृत्वाखाली FDA च्या पथकाची धडाक्यात कारवाई सुरु आहे. दिवाळी सणाच्या काळातही FDA ची कारवाई करण्यात आली असून राज्यातील तब्बल 9, 666 आस्थापनांची कसून तपासणी करण्यात आली असून यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 4,603 आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच 954 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 25 परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिलीयं.
पुढे बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले, सणासुदीच्या दिवसांत मिठाईला मोठी मागणी असते. त्यामुळे अनेकदा भेसळयुक्त किंवा शिळी मिठाई बाजारात येण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी नागरिकांनी केवळ २ दिवसांसाठी पुरेल इतकीच मिठाई खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. घरची मिठाई संपल्यानंतर गरजेनुसार बाजारातून पुन्हा ताजी मिठाई खरेदी करावी तसेच अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि ताजेपणा तपासणे ही काळाची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला. नागरिकांनी खबरदारी बाळगून सुरक्षित आणि आनंदी वातावरणात दिवाळी साजरी करावी, असं आवाहन तुकाराम मुंढे यांनी केलं आहे.
नामांकित आणि लेबल असलेली मिठाई आणि खवाच खरेदी करा, असं सांगतनाच जर काही संशयित किंवा भेसळ संदर्भात तक्रार असेल तर एफडीएला कळवा, आम्ही योग्य ती कारवाई करू, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे. तसेच मिठाई आणि इतर मिठाई दुकान आस्थापनांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सध्या राज्यात दिवाळी सणाची तयारी सुरु आहे. या सण-उत्सवाच्या काळात बाजारपेठा चांगल्याच भरलेल्या दिसून येत आहेत. नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. दिवाळी सणामध्ये फराळासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईची मागणी प्रचंड वाढते. मात्र, याच पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
भांडूपमध्ये लग्नाच्या कार्यक्रमात विषबाधा झाली. आयोजकांनी आम्हाला कळवणं अपेक्षित होतं, आम्हाला कळवलं नाही, ही त्यांची चूक आहे. लग्नातील व्हेंडरचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अधिकचे लोकं आल्याने जेवणाची अचानक ऑर्डर वाढली, जास्त जेवणासाठी त्यांना जे शक्य होतं ते त्यांनी केलं. कलाकंद, गुलाब जाममुळे विषबाधा झाली. जिथून स्वीट्स ऑर्डेर केले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.
तसेच दिवाळी पाडव्यासाठी व्हेंडर लावणार असाल तर त्याची माहिती आम्हाला द्यावी, त्यानंतर अधिकारी तपास करतील आणि मगच कार्यक्रम करा. जे असे लोकं आहेत दिवाळीचा फराळ देत असतील त्यांनीही आम्हाला माहिती देणं गरजेचं आहे. सामाजिक संस्थांनीही माहिती देणं गरजेचं आहे. एक्सपायरी झालेल्या मिठाई तपासून घ्याव्यात.
कोणत्याही वस्तू तुम्ही खरेदी करु नका, असं आवाहन तुकाराम मुंढेंनी केलं आहे.
