Big blow to Congress party in Solapur : सोलापुरामध्ये काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीतील दोन अधिकृत उमेदवारांनी अचानक पक्षाला रामराम ठोकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या दोन उमेदवारांपैकी एकाने थेट एमआयएममध्ये(AMIM) तर दुसऱ्या उमेदवाराने भाजपमध्ये(BJP) प्रवेश केला आहे. सोलापूर(Solapur) शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आणि माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी आज अधिकृतपणे एमआयएममध्ये प्रवेश केला. तर प्रभाग क्रमांक 15 मधील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मनीषा व्यवहारे यांनी भाजपात प्रवेश करत काँग्रेसला(Congress) धक्का दिला आहे.
विशेष म्हणजे, या दोन्ही उमेदवारांना काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिका निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या टप्प्यावर अधिकृत उमेदवारच पक्ष सोडत असल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली असून स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
दरम्यान, या पक्षांतरामुळे सोलापूर महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेससाठी ही बाब केवळ संख्यात्मक नव्हे, तर प्रतिमेच्या दृष्टीनेही मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे. एकीकडे भाजप आणि एमआयएम आपली ताकद वाढवत असताना, काँग्रेसला मात्र उमेदवार टिकवण्यात अपयश येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या घडामोडींवर काँग्रेस पक्षाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी आगामी काळात आणखी पक्षांतर होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना काँग्रेससाठी मोठा धक्का मानली जात असून, निवडणूक रणधुमाळीत या घडामोडींचा थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
