Download App

जालना लाठीचार्जच्या मागे ‘शासन आपल्या दारी’चे कनेक्शन; ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर मोठा आरोप

मुंबई : मला जी माहिती मिळाली त्यानुसार ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम सरकारला जालन्यात घ्यायचा आहे, त्यामुळे हे यांच्या मागे लागले होते की बस झालं, बस झालं, उठा, उठा, उठा आणि ते आंदोलनकर्ते सांगत होते की कोणीतरी आमच्याशी नीट बोलायला येऊ द्या, आम्हाला काहीतरी सांगू द्या आणि अचानक बाचाबाची सुरू झाली. एवढा अत्याचार, लाठीमार तिकडे झाला की एका 70 75 वर्षाच्या वृद्धेला मारहाण झाली आहे. घरात घुसून पोलिसांनी मारलेले आहे. एवढे पोलीस राक्षस होऊ शकतात का? असा संतप्त सवाल करत शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

मुंबईत आज शिवसेना (UBT) चा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी काल (1 सप्टेंबर) जालना येथील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जवरचा निषेध केला आणि शिंदे सरकारवर टीका केली. तसंच यावेळी त्यांनी आपण या आंदोलकांची भेट घेण्यासाठी संध्याकाळी जालन्याला जाणार असल्याचे जाहीर केले. आज सकाळी संभाजीराजे छत्रपती आणि दुपारी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही आंदोलकांची भेट घेतली. त्यांच्यापाठोपाठ आता ठाकरेही जालन्याला जाणार आहेत. (Uddhav Thackeray comments on lathicharge on Maratha reservation protestors at Antarwali Sarati in Jalna)

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

काल जालन्यात जो काही शासकीय अत्याचार झाला त्याचा आता नुसता निषेध करून चालणार नाही. एक तर सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निकालात सरकारवर ताशेरे मारलेलेच आहेत. सरकार काय आहे, कसं आहे हे सांगितलेलं आहे. सरकार म्हणजे नेमकं कोण? पाहिलं तर एक फुल दोन हाफ आहेत, पण कोणाकडेही वेळ नाही. राज्यात एक आंदोलन चालू आहे, लोकं माता-भगिनी उपोषणाला बसलेले आहेत, त्यावेळी यांना आपल्या विरुद्ध बोलायला वेळ आहे. पण आंदोलनकर्ते बसले तिकडे एकाही मंत्र्याला जावसं वाटलं नाही आणि आता चौकशीचा फार्स करणार, आम्ही जे झालं त्याच्या सखोल चौकशी करू म्हणजे किती खोल जाणार तुम्ही? असा सवाल त्यांनी केला.

मी मुख्यमंत्री होतो, प्रत्येक मुख्यमंत्र्याला एक राज्यात काय चाललेलं आहे याची कल्पना रोज दिली जाते, गृहमंत्र्याला तर दिली जातेच. कोण आंदोलन करते, कोण मोर्चे काढते, कोणाचं काय म्हणणे आहे, काय आपल्या या एक फुल दोन हाफला माहिती नव्हतं? आधी वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला मग बारसूमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि आता जालन्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर लाठीचार्ज झाला, या सगळ्याच्या चौकशा सुरु आहेत. पण ज्या पोलिसांनी कोरोना काळामध्ये आपल्या जीवाची बाजी लावून महाराष्ट्र वाचवला, ते पोलीस एवढे राक्षस होऊ शकतात का? सरकार बदलल्यावर पोलिसाचा राक्षस होऊ शकतो का? कोणतरी याच्यामागे आदेश देणार आहे, या सगळ्या गोष्टी आता लपून राहिलेल्या नाहीत. तुमच्या आदेशाशिवाय पोलीस वागू कसे असे वागू शकतात?

मला जी माहिती मिळाली त्यानुसार ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम सरकारला जालन्यात घ्यायचा आहे, त्यामुळे हे यांच्या मागे लागले होते की बस झालं, बस झालं, उठा, उठा, उठा आणि ते आंदोलनकर्ते सांगत होते की कोणीतरी आमच्याशी नीट बोलायला येऊ द्या, आम्हाला काहीतरी सांगू द्या आणि अचानक बाचाबाची सुरू झाली. एवढा अत्याचार, लाठीमार तिकडे झाला की एका 70 75 वर्षाच्या वृद्धेला मारहाण झाली आहे. घरात घुसून पोलिसांनी मारलेले आहे. एवढे पोलीस राक्षस होऊ शकतात का? आणि हे निर्विकापणाने आम्ही सखोल चौकशी करू, दोषींना सोडणार नाही सांगतात.

तर काय तुमचे सरकार चाटायचे आहे का?

सरकार आपल्या दारी म्हणजे करताय काय तुम्ही? या आंदोलनाला बसलेत त्यांच्याशी बोलायला तुम्हाला वेळ नसेल तर काय तुमचं सरकार चाटायचे का? म्हणून मी आज त्यांच्याकडे त्यांची विचारपूस करायला जात आहे. कारण शांततेने सगळं चालल होतं. आजपर्यंत मराठा समाजाने अनेक आंदोलनं केली, मूक मोर्चा काढले, सगळं काही केलं. पण कुठेही त्यांनी तोल ढळू दिला नाही. मी स्वतः त्याला साक्षी आहे. मी मुख्यमंत्री असताना सुद्धा मी अनेकदा त्यांच्यावर बोललेले आहे. त्यांच्या सूचना ऐकल्या आहेत, त्याच्याप्रमाणे आपण काम केलेलं आहे. पण त्यावेळी आताचे एक उपमुख्यमंत्री म्हणत होते, मी जे केलेलं ते 100% झाल्याशिवाय राहत नाही. मग करायचं होतं ते दीड वर्षात का केलं नाही? एक वर्षात का केलं नाही? काय तुम्ही पावलं टाकली होती या विषयाच्या दृष्टीने ते लोकांना सांगा, असं आव्हानही यावेळी ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं.

Tags

follow us