Uddhav Thackeray Shiv Sena Split Six Times Know History : महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी अस्मितेचा झेंडा उंचावणाऱ्या शिवसेनेला फुटीचा इतिहास काही नवीन नाही. 1966 मध्ये पक्षाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत शिवसेनेत तब्बल सहा वेळा मोठी बंडखोरी झाली आहे. विशेष म्हणजे, पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या काळातच चार वेळा मोठे राजकीय धक्के बसल्याचे चित्र आहे. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी बंडाचा झेंडा उभारल्याने फुटीच्या इतिहासात आणखी एका अध्यायाची भर पडली आहे. शिवसेनेच्या0 60 वर्षांत 6 बंड झाली यातील उद्धव ठाकरेंच्या काळातच 4 मोठे धक्के बसले नेमका बंडाळीचा इतिहास कसा त्याबद्दल जाणून घेऊया…
शिवसेनेतील पहिली बंडखोरी : बंडू शिंगरे
शिवसेनेच्या स्थापनेनंतर अवघ्या काही वर्षांतच पहिली मोठी फूट पडली. 1974 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला विरोध करत मुंबईतील प्रभावी नेते बंडू शिंगरे यांनी पक्ष सोडला आणि ‘प्रति शिवसेना’ नावाचा स्वतंत्र गट स्थापन केला. मात्र त्याला फारसे यश मिळाले नाही.
छगन भुजबळांनी दिला पहिला मोठा धक्का
1991 मध्ये शिवसेनेतील पहिली मोठी राजकीय बंडखोरी झाली. विधानसभा विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याने नाराज झालेल्या छगन भुजबळ यांनी 17 आमदारांसह शिवसेनेला रामराम ठोकला. त्यानंतर ते शरद पवार यांच्या गोटात दाखल झाले. ही शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीला बसलेली पहिली मोठी ठेच मानली जाते.
नारायण राणेंची बंडखोरी आणि स्वतंत्र पक्ष
नारायण राणे हे शिवसेनेतील अत्यंत प्रभावी नेते होते. मात्र उद्धव ठाकरे यांना राजकीय वारस म्हणून पुढे केले जात असल्याने त्यांच्यात आणि पक्ष नेतृत्वात मतभेद वाढले. अखेर 2005 मध्ये राणेंनी पक्षाला सोडचिठ्ठी देत स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू केली. पुढे त्यांनी ‘स्वाभिमान’ संघटना उभी केली आणि नंतर काँग्रेस व भाजपमध्ये प्रवेश केला.
राज ठाकरेंनी स्थापन केली मनसे
शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात चर्चित फूट 2006 मध्ये झाली. स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारस मानणारे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पक्षात वाढते महत्त्व मिळत असल्याने नाराजी व्यक्त केली. अखेर त्यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. ठाकरे कुटुंबातील ही सर्वात मोठी राजकीय फूट मानली जाते.
2022 मध्ये शिंदेंनीच हिसकावली शिवसेना
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला सर्वात मोठा धक्का 2022 मध्ये बसला. त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड पुकारले. या बंडामुळे केवळ सरकार कोसळले नाही, तर न्यायालयीन आणि निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेनंतर पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हही शिंदे गटाकडे गेले. उद्धव ठाकरे यांना नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने नव्याने पक्ष उभा करावा लागला.
2026 खासदारांचे बंड, उद्धवांसाठी आणखी एक धक्का
2024 च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडून आले होते. मात्र अवघ्या दोन वर्षांतच त्यापैकी सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. या खासदारांनी पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यानंतर आणि स्वतंत्र गटासाठी प्रयत्न सुरू केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर नवे संकट उभे ठाकले आहे.
उद्धव यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?
राजकीय विश्लेषकांच्या मते, शिवसेनेत बंडखोरीचा इतिहास जुना असला तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वकाळात झालेल्या सलग फुटींमुळे नेतृत्वशैली, पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांशी संवाद यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. एकनाथ शिंदे यांची बंडखोरी असो किंवा आता खासदारांचे असंतोष, या घटनांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोरील राजकीय आव्हाने अधिकच वाढवली आहेत.
फुटीचा इतिहास कायमच पाठलाग करणार
बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेली शिवसेना आज अनेक गटांमध्ये विभागली गेली आहे. बंडू शिंगरे, छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आता खासदारांचे बंड… या सर्व घटनांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, शिवसेनेच्या राजकारणात फुटीचा इतिहास हा पक्षाचा कायमचा पाठलाग करत आला आहे. आता सहा खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे हे नवीन संकट कसे हाताळतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
