देवभाऊ अभिनंदन! उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचं असलेल्या मुखपत्रातील संपादकीयमध्ये लिहिण्यात आलेल्या वाक्यांनी नुकत्याच सुरू झालेल्या नववर्षात पुन्हा एकदा राज्यात मोठा राजकीय खेळ होण्याचे संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रकाशित करण्यात आलेल्या संपादकीयमधील जवळपास प्रत्येक परिच्छेदात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक करण्यात आले आहे. त्यामुळे कौतुकाच्या माध्यमातून ठाकरेंनी मैत्रीची द्वारं खुली केली आहेत का? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. या कौतुकाचा अर्थ नेमका काय? याचाच घेतलेला हा आढावा…
Video : भाजपनं प्रवेशाचं द्वारं बंद करताच मदतीला धावले जानकर; भुजबळांना सुचवला भन्नाट मार्ग…
एक दिवसआधी म्हणजेच गुरूवारी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘डिप्रेशन’मध्ये असल्याचे म्हटल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सामनातील संपादकीयमधून कौतुकाचा वर्षाव केला आहे. ज्यात ‘देवभाऊ, अभिनंदन!’ मलईदार खाती आणि विशिष्ट जिल्ह्याचेच पालकमंत्रीपद मिळावे यासाठी अडून बसले असतानाच ‘नक्षलवाद्यांचा जिल्हा’ याऐवजी गडचिरोलीला ‘पोलाद सिटी’ ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवे, असे अग्रलेखात म्हटले आहे.
ठाकरेंच्या कौतुकावर फडणवीस काय म्हणाले? ऐका…
संपादकीय प्रत्येक ओळीत दडलाय एक संदेश
‘देवाभाऊ, अभिनंदन!’या मथळ्याखाली प्रकाशित झालेल्या सामनातील संपादकीयतील प्रत्येक ओळ काही ना काही संदेश देत आहे. त्यामुळे जरी कुणीही स्पष्टपणे जरी बोललं नाही तरी, ठाकरेंचा बदललेला मूड मोठे संकेत देत आहे. यात ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनीही जोड दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणतात की, आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. कौतुक, का? तर, सरकारने चांगले काम केले आहे. आम्ही विरोधी पक्षात असलो तरी महाराष्ट्र राज्य आमचे आहे. राऊतांचे हे बोल आणि संपादकीयमधील कौतुकाचे शब्द राज्यात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होणार असल्याचेचं संकेत देत आहेत.
#WATCH | Mumbai, Maharashtra | Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, "We have praised Devendra Fadnavis as the govt has done a good job. Maharashtra is our state and a place like Gadchiroli which is affected by naxalism – if the Naxalites surrendered and opted for the… pic.twitter.com/dyNsTOwFOZ
— ANI (@ANI) January 3, 2025
ठाकरेंच्या कौतुकाचा नेमका अर्थ काय?
लोकसभा आणि त्यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यात अजित पवारांनी पवारांच्या वाढदिवशी नवी दिल्लीत सहकुटुंब भेट घेत काकांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर नुकतीच अजितदादांच्या आईनेदेखील पंढरपुरात विठोबाचे दर्शन घेतल्यानंतर कुटुंबातील वाद संपू देत असं साकडं घातलं आहे. एवढेच नव्हे तर, नागपूरमध्ये पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेत त्यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल पुच्छगुच्ध देऊन अभिनंदन केले होते. यावेळी आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई हेदेखील उपस्थित होते. या भेटीवेळीही ठाकरे आणि फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली होती. त्यावेळीदेखील राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा रंगली होती.
त्यात उद्धव ठाकरेही इंडिया आघाडीत नाराज असल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर, ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपची साथ सोडण्याचा पश्चाताप होत आहे. त्यामुळेच सामनातून फडणवीसांवर कौतुकाच्या माध्यमातून ठाकरेंनी भाजपसोबत पुन्हा नव्या मैत्रीच्या चर्चांना सुरूवात केल्याचं बोललं जात आहे. या कौतुकाच्या शब्दांकडे भाजपकडून कसा प्रतिसाद मिळतो आणि खरचं जुन्या मित्रपक्षांमध्ये पुन्हा नव्याने मैत्रीची पालवी फुलते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.