Umesh Patil makes a major, sensational revelation : अजित पवार यांच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता असल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी व्यक्त केला आहे. माझ्याकडे याबाबत कोणताही पुरावा नाही, मात्र मला अजित पवार यांचा घातपात झाल्याचे वाटते. एक दिवस याबाबत मी नक्की बोलेन, असे मोठे विधान पाटील यांनी केले. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी आक्षेप घेतला. कदम यांनी आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे द्यावेत, हवेत आरोप करू नयेत, असे आव्हानही त्यांनी दिले.
उमेश पाटील आज बारामती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना हे वक्तव्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही उमेश पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या चर्चा केवळ माध्यमांमध्ये सुरू आहेत. सुनील तटकरे यांनी यापूर्वी वेगळी भूमिका मांडली आणि आता वेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे त्यांची भूमिका आता तटस्थ झाल्याचे दिसते, असे पाटील म्हणाले.
मी जबाबदारीने सांगतो की, विलीनीकरणाबाबत सध्या कोणतीही चर्चा सुरू नाही. आगामी काळात अशी चर्चा होईल की नाही, हे सांगता येणार नाही. मात्र, आत्ता तरी दोन्ही पक्षांमध्ये विलीनीकरणाबाबत चर्चा झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्या पक्षाला एनडीएमध्ये सहभागी व्हायचे असेल, तर त्यांना सोबत घ्यायचे की नाही, याचा निर्णय भाजपने घ्यावा. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका असणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच आमच्या गटातील आमदार शरद पवार यांच्या भेटीसाठी जाणार असल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
भारतीयांच्या फोनमध्ये काय होतंय डाऊनलोड? युजर्सचे मोठं सिक्रेट सांगणारा रिपोर्ट…
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तटकरे यांच्यावर टीका करताना कदम म्हणाले होते की, अंतुले साहेबांचे पीए असताना त्यांनीच अंतुले यांना संपवले. जो कोणी तटकरे यांच्या जवळ जातो, त्याला संपवण्याचे काम ते करतात, असा आरोपही कदम यांनी केला. तसेच, त्यांना स्वतःला उपमुख्यमंत्री व्हायचे होते, असे मी ऐकतोय. मग अजितदादांच्या घातपातामागे यांचाही हात होता का, या दिशेने तपास करावा, असे विधान रामदास कदम यांनी केले होते. तटकरे यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा असून ती पूर्ण करण्यासाठी ते काहीही करू शकतात, असा दावाही त्यांनी केला.
मात्र, रामदास कदम यांनी केलेले सर्व आरोप सुनील तटकरे यांनी फेटाळून लावले आहेत. आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिले. तसेच पत्रकार परिषद घेऊन या आरोपांना उत्तर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रामदास कदम यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उमेश पाटील यांनी या वादाकडे स्थानिक राजकीय संघर्षाच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज व्यक्त केली. रामदास कदम यांनी यापूर्वीही सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले आहेत. तटकरे हे गेल्या 40 वर्षांपासून कोकणात राजकारण करत असून, शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष रुजवण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे या आरोपांकडे स्थानिक पातळीवरील राजकीय संघर्ष म्हणून पाहिले पाहिजे, असे पाटील म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त करणारे वक्तव्य, रामदास कदम यांचे सुनील तटकरे यांच्यावरील आरोप आणि विलीनीकरणाच्या चर्चांवर उमेश पाटील यांनी केलेले स्पष्टीकरण यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
