Uttar Pradesh Accident : महाराष्ट्रातील भाविकांच्या बसचा उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये भीषण अपघात (Uttar Pradesh Accident) झाल्याची दुर्घटना घडलीयं. वाराणसी-गोरखपूर महामार्गावर भाविकांची बस अनियंत्रित होऊन पलटी झाल्याने दोन महिला भाविकांचा जागीच अंत झाला असून 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. या बसमध्ये 38 भाविक देवदर्शनासाठी निघाले होते. त्यातील 35 भाविक जखमी असून 3 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून यातील एक महिला बुलढाण्यातील तर दुसरी महिला अकोल्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आलीयं.
या अपघातातील भाविकांची बस चित्रकूट आणि वाराणसीचे दर्शन घेऊन नेपाळमधील काठमांडूच्या दिशेने रवाना झाली होती. दरम्यान, बस चालकाचे बसवरून नियंत्रण सुटल्याने नैसरे गावाजवळ समोरून येणाऱ्या एका बोलेरो गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस वेगाने दुभाजकाला धडकली आणि महामार्गावरच उलटली. गुरुवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्य सुरु केलं. आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या सूचनेनंतर शिवसेनेची टीम देखील घटनास्थळी पोहचली असून मदत कार्य सध्या सुरु आहे. या बस मध्ये एकूण 38 भाविक असून ते तीर्थदर्शनासाठी निघाले होते. यातील 35 यात्रेकरू जखमी असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
