तुकाराम मुंढेंच्या रडारवर वडापाव व्यावसायिक; वर्तमानपत्रातील पॅकिंगवर एफएसएसएआयची कडक भूमिका

अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीबाबत कठोर भूमिका घेतल्याने वडापाव व्यावसायिक आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते प्रशासनाच्या रडारवर

Untitled Design 44

Untitled Design 44

Vada Pav Business on Radar : मुंबईतील एका प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याकडे खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी आणि वाढण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर होत असल्याचे समोर आल्यानंतर अन्न सुरक्षा यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएआय) आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने संयुक्त कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीबाबत कठोर भूमिका घेतल्याने राज्यातील वडापाव व्यावसायिक आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते प्रशासनाच्या रडारवर आल्याची चर्चा आहे.

मुंबईतील घटनेनंतर एफएसएसएआयच्या पश्चिम विभागाने स्पष्ट निर्देश जारी करत कोणत्याही खाद्यपदार्थाचा थेट संपर्क वर्तमानपत्राशी येऊ नये, असे आदेश दिले आहेत. वडापाव, भजी, समोसे, कचोरी यांसारखे पदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळणे, वाढणे किंवा अतिरिक्त तेल शोषण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर करणे नियमबाह्य असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले आहे.

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अंमलबजावणीवर भर

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी, भेसळविरोधी कारवाया आणि ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे एफएसएसएआयच्या नव्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील खाद्य व्यवसायांवर अधिक बारीक नजर ठेवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, वडापाव गाड्या, फेरीवाले, लहान हॉटेल्स आणि खानावळींमध्ये वर्तमानपत्राचा वापर अजूनही मोठ्या प्रमाणात होत असल्याने अशा ठिकाणांची तपासणी वाढू शकते.

लंडनमध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कार्यक्रमात गदारोळ, भारतीय उच्चायोगाने सुनावले खडे बोल

वर्तमानपत्राचा कागद धोकादायक का?

एफएसएसएआयच्या मते, वृत्तपत्रांच्या छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये शिसे, जड धातू, रासायनिक रंगद्रव्ये आणि इतर घातक घटक असू शकतात. गरम खाद्यपदार्थ या कागदाच्या संपर्कात आल्यास हे रासायनिक घटक अन्नामध्ये मिसळण्याचा धोका निर्माण होतो. याशिवाय वर्तमानपत्र वितरण आणि हाताळणीदरम्यान अनेकांच्या संपर्कात येत असल्याने त्यावर धूळ, घाण आणि विविध प्रकारचे रोगकारक जंतू असू शकतात. त्यामुळे अशा कागदात अन्नपदार्थ गुंडाळणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

कायदा आधीपासूनच स्पष्ट

अन्न सुरक्षा आणि मानके (पॅकेजिंग) नियम 2018 नुसार अन्न साठवण्यासाठी, गुंडाळण्यासाठी किंवा वाढण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर करण्यास स्पष्ट बंदी आहे. तसेच अन्नावरील अतिरिक्त तेल शोषण्यासाठी किंवा खाद्यपदार्थ झाकण्यासाठीही वर्तमानपत्र वापरण्याची परवानगी नाही. तरीदेखील अनेक ठिकाणी हा नियम पाळला जात नसल्याचे दिसून येत असल्याने आता त्याच्या अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे.

जीडीपी वाढीची दमदार झेप; चौथ्या तिमाहीत 7.8%, वार्षिक विकासदर 7.7 टक्क्यांवर

एफएसएसएआय आणि एफडीएची संयुक्त मोहीम

अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एफएसएसएआय आणि राज्यातील एफडीए संयुक्तपणे काम करणार आहेत. सुरक्षित आणि मान्यताप्राप्त फूड-ग्रेड पॅकेजिंगचा वापर वाढवणे, ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि नियमांचे पालन सुनिश्चित करणे यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. त्यामुळे आता वर्तमानपत्रात वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थ देणाऱ्या विक्रेत्यांना अधिक सावध राहावे लागणार आहे. कारण ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या पद्धतींवर एफएसएसएआयबरोबरच तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएचीही करडी नजर असणार आहे.

Exit mobile version