Download App

Satara : लडाखमधील दुर्घटनेत महाराष्ट्राचा जवान शहीद; साताऱ्याच्या वैभव भोईटे यांना वीरमरण

सातारा : लडाखमध्ये काल (शनिवार) भारतीय सैन्याच्या गाडीला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सैन्याचे 9 जवान शहीद झाले आहेत. यात महाराष्ट्रातीलही सुपुत्रालाही वीरमरण आले आहे. साताऱ्याचे जवान वैभव भोईटे या दुर्घटनेत शहीद झाले आहेत. शहीद जवान वैभव भोईटे हे मूळचे हिंगणगाव (ता. फलटण) येथील असून राजाळे (ता. फलटण) येथे स्थायिक होते. (Vaibhav Bhoite from satara has been martyred in an army vehicle accident in Ladakh)

लडाखमध्ये शनिवारी सायंकाळी भारतीय लष्कराच्या वाहनाला मोठा अपघात झाला. कियारी शहरापासून 7 किमी अंतरावर वाहन खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला आहे. सैनिक कारू चौकीतून लेहजवळील कायरीकडे जात होते. शहीद झालेल्यांमध्ये एक जेसीओ आणि उर्वरित 8 जवान आहेत.

भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एएलएस वाहन लेहहून न्योमाकडे जात होते. संध्याकाळी 5:45 ते 6:00 च्या सुमारास ते कायरीच्या 7 किमी आधी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि  पावणे पाचच्या सुमारास दरीत कोसळले. गाडीत लष्कराचे 10 जवान होते. यापैकी नऊ जणांना वीरमरण आले आहे, तर  एकजण जखमी झाला. जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शहीद जवानांची नावे :

दरम्यान, या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला असून शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. लेहजवळ झालेल्या दुर्घटनेने आपण भारतीय लष्कराचे जवान गमावले आहेत. त्यांची देशासाठी केलेली भरीव सेवा सदैव स्मरणात राहील. शोकग्रस्त कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला. तसंच जखमी जवान लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थनाही केली.

तर राजनाथ सिंह यांनी ट्विट करुन, लडाखमधील लेहजवळ झालेल्या अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या मृत्यूने मी दु:खी आहे. त्यांनी देशासाठी केलेली अतुलनीय सेवा आम्ही कधीही विसरणार नाही. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी जवानांना फील्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशा शब्दात त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

Tags

follow us