सिंधुदुर्ग : कोणतीही विकासकामे करता येत नाही. दुसऱ्यांनी कामे केली तर पोटदुखी होणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांचे राजकारण संपत चालले आहे. त्यांची आता स्वत:च्या मुलाला आमदार करण्यासाठी धडपड सुरु आहे. मात्र, सिंधुदुर्गची जनता सुज्ञ आहे. आता राणे पिता-पुत्रांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या (Bharadi Devi) यात्रेनिमित्त भाजपने (BJP) घेतलेला कार्यक्रम हा भाजपचा मेळावा होता की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निरोप समारंभ होता, असा प्रश्न सिंधुदुर्गमधील जनतेला पडला होता, अशी सडकून टीका शिवसेनेचे (Shivsena) कुडाळचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी राणे पिता-पुत्रांवर केली.
सिंधुदुर्गमध्ये भाजपची सभा झाली. या सभेमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. नारायण राणे यांनी तर ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले. अडीच वर्षात साधी बालवाडी सुद्धा कोकणात बांधली नाही. कोकणासाठी काहीच केलं नाही. उलट टक्केवारीने ठेकेदारी दिली, अशी टीका ठाकरे यांच्यावर केली. त्यावर उत्तर देताना शिवसेनेचे कुडाळचे आमदार वैभव नाईक म्हणाले की, खरंतर कालची सभा ही भाजपचा आनंद मेळावा होता की राणीचा निरोप समारंभ होता. कालची सभा ही लोकांना मनस्ताप देणारी होती. गेले अनेक वर्षे भराडी देवीची यात्रा भरते. अनेक राजकीय पक्ष, हजारो लोक देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने या ठिकाणी येतात. परंतु, ही पहिल्यांदा अशी सभा झाली की ज्या सभेला असलेल्या गर्दीचं परिवर्तन सभेमध्ये करण्यासाठी या ठिकाणी मोठी गडबड केली. परंतु, लोकांना त्यांचा मोठा मनस्ताप झाला.
वैभव नाईक म्हणाले की, मी राणेंना प्रश्न विचारतो की, राणेंनी केंद्रीय मंत्री म्हणून सिंधुदुर्गमधील जनतेसाठी काय काम केले. ही सभा फक्त आमच्यावर आरोप करण्यासाठी होती की काय असा प्रश्न येथील जनतेला पडला. माझ्यावर देखील निशाणा साधण्यात आला. खरंतर मी त्यांचा दोन वेळा पराभव केला आहे. त्यामुळे त्यांच्या पोटामध्ये दुखणारं आहे. या पुढच्या काळामध्ये सुद्धा ते माझ्यावर टीका करतील. परंतु, उद्धव ठाकरे यांनी येथे शासकीय मेडिकल कॉलेज उभे केले. मी आज अनेक कॉलेज करण्यासाठी या जिल्ह्यामध्ये प्रयत्न करतोय. त्यामुळे राणेंना दुसऱ्याने काय केलं तर ते सहन होत नाही. त्यामुळे राणे आरोप करतात. राणें यांनी आपल्या चार वर्षांमध्ये काय केलं, हे आधी येथील लोकांना सांगावे. रवींद्र चव्हाण आणि त्यांच्यामध्ये काल सुप्त संघर्ष दिसून आलेला आहे. त्यामुळे राणेंचे आता या जिल्ह्यातनं राजकीय अस्तित्वाच हळूहळू संपत चालले आहे हे कालच्या सभेवर दिसून आले आहे.