Download App

आमदार बच्चू कडू यांचा अपघात; डोक्याला गंभीर दुखापत

आमरावती : मागील 20 दिवसांत महाराष्ट्रातील तीन आमदारांच्या कारला अपघात झाला आहे. आज अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा रस्ता क्रॉस करताना अपघात झाला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा आमदारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

बच्चू कडू यांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने डोक्याला मार लागला आहे. यात ते जखमी झाले असून त्यांना तात्काळ अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याची माहिती आहे. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

आज अमरावती शहरात सकाळी सहा ते साडेसहा च्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या दुचाकीच्या धडकेत बच्चू कडू रोडच्या दुभाजकावर जोरदार आदळल्याने डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्याची माहिती आहे.

दरम्यान, मागील 20 दिवसांत महाराष्ट्रातील तीन आमदारांच्या कारला अपघात झाला आहे. भाजप आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला अपघात झाला.

या अपघतात तिन्ही आमदार जखमी झाले आहे. त्याआधी 14 ऑगस्ट 2022 रोजी शिवसंग्रामचे नेते तथा आमदार विनायक मेटे यांचे कार अपघातात निधन झाले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.

Tags

follow us