Download App

बुलढाण्यात टक्कल व्हायरस बाधित वाढले; तपासणीतून आजाराचं कारणही सापडलं..

बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांत फंगल इन्फेक्शनमुळे लोकांच्या डोक्यांवरील केस गळत असावेत असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांत एका अजब आजारानं चांगलंच थैमान घातलं आहे. तुम्हाला ऐकून कदाचित विश्वास बसणं थोडं कठीण होईल पण हे खरं आहे. लोकांच्या डोक्याला खाज सुटते आणि केस गळायला लागतात. यानंतर काही दिवसांत डोक्यावर टक्कल होते. साधारणतः शाम्पू जास्त प्रमाणात वापरल्याने केस गळतात असे मानले जाते. पण ज्यांनी आयुष्यात कधीच शाम्पू वापरला नाही त्यांचेही केस अचानक गळू लागल्याने बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील बोंडगाव, हिंगणा, कालवड या तीन गावात या आजाराचा प्रादु्र्भाव दिसून येत आहे. हा आजार नेमका काय आहे, कशामुळे होत आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. फंगल इन्फेक्शनचा हा प्रकार आहे असे मत तज्ज्ञांनी प्रथमदर्शनी व्यक्त केले आहे.

बुलढाण्यात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ; फक्त तीन दिवसांत पडतंय टक्कल

फंगल इन्फेक्शनमुळे हा आजार होत असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप ठोस माहिती नाही. पाणी आणि त्वचेचे नमुने घेण्यात येऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणीचे अहवाल हाती आल्यानंतरच या आजाराचं खरं कारण समजू शकणार आहे.  ज्या गावात असे रुग्ण आढळून आले आहेत त्या गावात वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यातील शेगाव तालु्क्यात बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, हिंगणा वैजनाथ, घुई या गावांत टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता 51 पर्यंत पोहोचली आहे.

या आजाराच्या लक्षणांचा विचार केला तर सर्वात आधी डोक्याला खाज सुटते. नंतर केस गळू लागतात. तिसऱ्या दिवशी चक्क टक्कलच पडते. त्यामुळे नागरिकांत भीती पसरली आहे. शेगाव तालुका शिवसेनाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी निवेदन देऊन या समस्येची तत्काळ दखल घेण्यात यावी. गावागावात उपचार शिबीरे आयोजित करावीत अशी मागणी केली आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावर आता आरोग्य विभागाकडून काय कार्यवाही केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us