Eknath Shinde : ‘मी घरातून बाहेर पडतो. पण काही लोक घरातून बाहेर पडतच नाहीत. जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा तेव्हा मी तिकडे जातो. काही लोक घरातून बाहेर पडले की थेट देशाच्या बाहेरच जातात. पण जाऊ द्या. त्यांचं त्यांना लखलाभ’, अशा शब्दांत राज्याचे उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर (Uddhav Thackeray) खोचक टीका केली. एकनाथ शिंदे आभार दौऱ्यानिमित्त बुलढाण्यात होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. यावेळी आमदार संजय गायकवाड उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले, मी फक्त बोलून लांब थांबणारा नाही. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांनी मी भेटलो. त्यांच्या भावना जाणून घेतल्या. कुटुंबियांनी सांगितलं आमच्यासाठी तुम्ही येथे आलात आता आम्हाला खात्री आहे की आम्ही सुखरुप घरी परतू. पहलगाम येथील दहशतवादी हल्ला हा दुर्दैवीच होता. म्हणून त्या ठिकाणी जाणं हे माझं कर्तव्य होतं. परंतु, यावरही आता राजकारण होत आहे अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली.
एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या गावी गेले होते. काही दिवस त्यांनी येथे मुक्कामही केला होता. यावर ठाकरे गटाकडून जोरदार टीका झाली होती. ठाकरे गटाच्या नेत्यांच्या टीकेचा त्यांनी याच भाषणात समाचार घेतला. शिंदे म्हणाले, मी गावाला गेलो की राजकारण केलं जातं. मी शेती करायला गेलो, असं हिणवलं जातं. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेती करायला जाणार नाही तर मग कशाला जाणार. काही लोक तर घरातून बाहेरच पडत नाहीत. ते घराच्या बाहेर पडले की थेट देशाच्या बाहेरच जातात असा खोचक टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.