नागपूर : “तुझे काम चांगले नाही. तू कामात कमी पडत आहेस. अनेक ठिकाणी सुधारणा करण्याची गरज आहे” या शेरेबाजीच्या रागातून कनिष्ठ सहकाऱ्याने त्याच्या वरिष्ठ सहकाऱ्याचा चाकू भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये (Nagpur) घडली आहे. एल. देवनाथन एनआर लक्ष्मीनरसिमन (21) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर चंदेल असे संशयित आरोपीचे नाव आहे. दोघेही नागपूर येथील मिहानमध्ये हेक्सवेअर टेकनॉलोजीमध्ये काम करत होते. (junior colleague killed his senior colleague out of anger over a comment on the quality of work)
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, एल. देवनाथन एनआर लक्ष्मीनरसिमन हा असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत होता. तर चंदेल त्याचा कनिष्ठ सहकारी होता. श्याम नगरमधील एका फ्लॅटमध्ये देवनाथन, चंदेल आणि पवन अनिल गुप्ता हे दारु प्यायला बसले होते. यावेळी नशेत देवनाथनने चंदेलच्या कामाबाबत भाष्य केले. “तू कामात कमी पडत आहेस. अनेक ठिकाणी तुझ्या कामात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.” देवनाथन याच्या या टिप्पणीचा चंदेलला चांगलाच राग आला. याच रागाच्या भरात चंदेलने चाकूने देवनाथनच्या छातीवर वार केला.
चंदेललने केलेला वार देवनाथच्या वर्मी बसला अन् त्याचा मृत्यू झाला. यानंतर घाबरलेल्या चंदेल आणि अनिल यांनी देवनाथनला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. बाथरुममध्ये पडल्यामुळे त्याला लागले असे त्यावेळी त्यांनी डॉक्टरांना सांगितले. पण घावाचे वार स्पष्ट दिसत होते. त्यावरुन घडलेली घटना उघडकीस आली. त्यानंतर देवनाथन याच्या भावाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी तपास करताच चंदेल याने त्याचा गुन्हा कबूल केला. यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन चंदेल याला अटक करण्यात आली आहे.