Maharashtra Cabinet Expansion : राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आज (Maharashtra Cabinet Expansion) मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर शहरातील राजभवनात (Nagpur) शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी भाजपाच्या १९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ११ आमदारांनी तर अजित पवार गटातील ९ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुतीतील एकूण ३३ आमदारांनी कॅबिनेट तर सहा आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वात आधी शपथ घेतली. त्यानंतर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी आमदारांनी शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह वरिष्ठ नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांत भारतीय जनता पार्टीच्या चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आणि संजय सावकारे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांनी शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, भरत गोगावले आदींनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. भाजपने १३२ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही सरस कामगिरी केली. शिंदे गटाने ५७ तर राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागा जिंकल्या. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
शपथविधीच्या तोंडावर शिंदेंना धक्का! मंत्रिपद न मिळाल्याने आमदाराचा तडकाफडकी राजीनामा
या नंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. कुणाला मंत्रिपद द्यायचं कुणाला डच्चू द्यायचा याची चर्चा सुरू झाली. अनेक आमदारांनी मंत्रिपदासाठी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली होती. त्यामुळे मंत्रिपद कुणाला मिळणार याची उत्सुकता होती. पक्षाच्या वरिष्ठांच्या मॅरैथॉन बैठका सुरू होत्या. खातेवाटपात रस्सीखेच दिसून आली तशीच रस्सीखेच मंत्रिपदातही दिसून आली.
यानंतर मंत्रिपदासाठी नावं निश्चित करण्यात आली. प्रसारमाध्यमांतून संभाव्य मंत्र्यांच्या याद्याही व्हायरल होऊ लागल्या होत्या. आज सकाळपासूनच भावी मंत्र्यांना शपथ घेण्यासाठी फोन केले जाऊ लागले होते. त्यानंतर राजभवनात हजेरी लावत पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यावेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.