Nagpur News : ‘मागील पंधरा वर्षांपासून येथे जे प्रतिनिधी आहेत. विधानसभेच्या आमदारांचं कर्तव्य होतं की त्यांनी या मतदारसंघाला काही द्यायला पाहिजे होतं. नवीन योजना द्यायला पाहिजे होत्या. नवीन प्रकल्प आणायला पाहिजे होते. पण या गोष्टी पंधरा वर्षात देखील होऊ शकल्या नाहीत. २०१४ नंतर किती बेरोजगारी वाढली हे सगळ्यांनाच माहिती आहे. हे सगळं कृष्णा खोपडेंचंच अपयश आहे. त्यांच्या मुलालाच नोकरी नाही त्यांचा मुलगाच बेरोजगार आहे. मला जनतेचं, नागरिकांचं काम करायचं आहे, म्हणून मी विधानसभा लढण्याचं कारणही तेच आहे’, अशा शब्दांत नागपूर पूर्व मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांनी आपलं व्हिजन क्लिअर केलं.
लेट्सअप चर्चा या विशेष कार्यक्रमात पेठे यांनी मतदारसंघातील प्रश्न, समस्या, विद्यमान आमदाराचं अपयश, नागपूर शहरात वाढलेला गुन्हेगारी, ढासळलेली कायदा सुव्यवस्था या महत्वाच्या मुद्द्यांवर बेधडक मते व्यक्त केली. मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावर बोलताना पेठे म्हणाले, ‘महायुतीने नागपुरचा विकास केला म्हणता पण या विकासात कुठे समानता दिसत नाही. इथल्या लोकांना रोड ट्रान्सपोर्टेशन पाहिजे पण येथे त्यांनी मेट्रो दिली. मेट्रोपर्यंत जायचं कसं? मेट्रोत बसल्यानंतर जायचं कुठे? हा प्रश्न आहे.’
‘येथे कोणत्याही प्रकारचे रोजगार उद्योग नाहीत. मेट्रोला आमचा विरोध नाही पण त्याआधी येथे एखादा इंडस्ट्रीयल हब झाला असता तिथे मोठ्या कंपन्या आल्या असत्या त्यातून रोजगार निर्माण झाला असता आणि यामुळे शहरात लोक आले असते. म्हणून मग त्यांच्यासाठी मेट्रोची गरज राहिली असती.’
‘स्वातंत्र्यांच्या काळापासून येथे काँग्रेसचंच वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे आतापर्यंत काँग्रेसचेच उमेदवार लढत होते. पण यंदा शरद पवार गटाने मला संधी दिली आहे. याचं कारण आहे. मागील काही वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपाचा गड झाल्यासारखा दिसत आहे. पंधरा वर्षांपासून काँग्रेस येथे जिंकू शकली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व वरिष्ठ नेत्यांनी विचार करून मला संधी देण्यात आल्याच एका प्रश्नाच्या उत्तरात पेठे यांनी सांगितले.
नागपूर पूर्व मतदारसंघ काँग्रेसचा होता. राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक असताना येथे राष्ट्रवादीला का उमेदवारी दिली गेली असा प्रश्न विचारला जात आहे. यावर पेठे म्हणाले, ‘नक्कीच ही जागा काँग्रेसचीच होती. काँग्रेसच लढणार अशी मानसिकता होती. परंतु, एक दोन वर्षांपूर्वी मला शरद पवार साहेबांनी नागपूर शहराची धुरा दिली. नागपूरमध्ये मी पक्षाचं मोठं संघटन उभारलं त्यामुळे पक्षाने माझा विचार केला असं मला वाटतं. काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मनात नाराजी असेल तर नक्कीच दूर करू आणि ही जागा निवडून आणण्यासाठी तिन्ही पक्ष प्रयत्न करू.’, असा विश्वास पेठे यांनी व्यक्त केला.
मतदारसंघातील नाराजी कशा पद्धतीने दूर करणार या प्रश्नावर पेठे म्हणाले, ‘कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा पराभव करायचा हे महाविकास आघाडीचं स्पष्ट धोरण आहे. काँग्रेस विचारधारेचा कार्यकर्ता कधीच भाजपला समर्थन करणार नाही. जर मला कुणी मला विरोध करत असेल तर त्याचा फायदा भाजपलाच होईल. त्यामुळे असं काही होणार नाही. जर एखाद्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याची नाराजी असेल तर पक्ष नेतृत्वाला सांगून नाराजी दूर करू.’
आतापर्यंत येथे भाजप आणि काँग्रेस लढत होते आता राष्ट्रवादीचा उमेदवार आहे, तेव्हा ही निवडणूक आव्हानात्मक आहे की सोपी? या प्रश्नावर पेठे म्हणाले, ‘निवडणूक आव्हानात्मक आहेच. प्रतिस्पर्ध्याला कमी समजण्याचं काही कारण नाही. पण, आमचे कार्यकर्ते, आमचं जे संघटन आहे. आम्ही लोकांपर्यंत पोहोचून निवडणूक नक्कीच जिंकू असा विश्वास वाटतो.
नागपूरमधील गुन्हेगारी राज्यात चर्चेचा विषय असते याकडे कसं पाहता, असे विचारले असता ‘निश्चितच शहरात गुन्हेगारी वाढली आहे. मागील साडेसात वर्षांपासून देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. या काळात गुन्हेगारीच्या घटना जास्त प्रमाणात उघडकीस आल्यात यामागचं कारण शोधलं पाहिजे. परंतु, तसं झालं नाही. नागपूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात असंच चित्र आहे. राज्य, केंद्र आणि येथील महापालिकेत सत्ता आल्याने भाजपचा पदाधिकारी इतका निडर झाला आहे की त्याला कोणतीच भीती राहिलेली नाही. पोलिसांवर दबाव आणण्याचं काम इथल्या भाजपाच्या काही लोकांनी केलंय. तुम्ही काही बातम्या पाहत असाल “हमारा बॉस सागर बंगले में बैठता है”, असं सांगितलं जातं. जर ही आपल्या नेते मंडळींची मानसिकता असेल तर सर्वसामान्य माणूस कुठे जाईल’, असा सवाल दुनेश्वर पेठे यांनी व्यक्त केला.