मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना शिवडी कोर्टाने मोठा दणका दिला आहे. जात पडताळणी प्रकरणात नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कौर (Harbhajan Singh Kaur) यांना फरार घोषित करण्यात आलं आहे.
याशिवाय नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसंच एक महिन्याच्या आत कोर्टापुढे हजर न राहिल्यास प्रॉपर्टीही जप्त करण्यात येण्याची शक्यता आहे.
जात पडताळणी प्रकरणात शिवडी कोर्टानं (Shivadi Court) हे निर्देश दिलेत. या प्रकरणातली पुढची सुनावणी 16 फेब्रुवारीला होणार आहे.
तसेच नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेली प्रकरणं दोन्ही वेगवेगळी असल्याचे निरीक्षण शिवडी कोर्टाने यावेळी नोंदवले आहे.
नवनीत राणा या लोकसभेला ज्या मतदारसंघामधून निवडून आल्या आहेत. तो मतदारसंघ हा अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव होता. मात्र, राणांनी आपण अनुसूचित जातीतच असल्याचा दावा करत ही निवडणूक लढवली. पण त्यांनी दाखल केलेले जातीचे प्रमाणपत्र व शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये फेरफार करण्यात आला असल्याचे समोर आले आहे.
यानंतर राणा आणि त्यांचे वडिल हरभजन सिंह कौर यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर राणांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत या प्रकरणामधून दोषमुक्त करण्याच्या विनंतीची याचिका दाखल केली होती. पण ही याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली होती.