Nagpur News : नागपूर शहरातून एक धक्कादायक बातमी आली आहे. प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी रामकृष्ण मठात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. उबाळे यांनी आत्महत्या का केली याचं उत्तर पोलिसांनी प्राथमिक अंदाजानं दिलं आहे. कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केली असाी असा नागपूर पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आशिष उबाळे मुळचे नागपूरचेच आहेत. सध्या ते महाल परिसरात राहत होते.
आशिष उबाळे यांनी आत्महत्या का केली याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणी काही प्राथमिक माहिती हाती आली आहे. यानुसार आशिष उबाळे मागील काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. शुक्रवारी संध्याकाळी त्यांचा लहान भाऊ सारंग उबाळे त्यांना भेटण्यासाठी आले होते. सारंग उबाळे हे रामकृष्ण मठात सेवेकरी म्हणून काम करतात.
आशिष रामकृष्ण मठात गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामाला होते. त्यांनी सकाळी मठात जेवण केले नंतर थोडा आराम करण्यासाठी खोलीत गेले. परंतु, नंतर ते खोलीतून बाहेर आलेच नाहीत. इतका वेळ झाला तरी भाऊ बाहेर येत नाही म्हणून सारंग उबाळे अस्वस्थ झाले. ते खोलीकडे गेले. परंतु, आशिष उबाळे यांनी दरवाजा उघडला नाही. अनेकदा आवाज देऊनही काहीच उपयोग झाला नाही.
राज्याला वादळी पावसाचा तडाखा! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी; छत्री घेऊनच बाहेर पडा
त्यामुळे या प्रकाराची माहिती मठ प्रशासनाने पोलिसांना दिली. पोलीस लागलीच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा उघडून पाहिलं तर आत आशिष उबाळे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. त्यात आशिष उबाळे यांनी स्वतःला व्हॉट्सअपवर एक नोट पाठवली होती. यात त्यांनी आत्महत्येचे कारण स्पष्ट केले होते. कर्जाच्या ओझ्यापायी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी या नोटमध्ये म्हटले होते.
आशिष उबाळे यांनी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ काम केलं. त्यांनी ‘अग्नी’, ‘श्वासावे अंतर’, ‘गजरा’, ‘चक्रव्यूह’ यांसारख्या मराठी मालिकांचे दिग्दर्शन केले होते. ‘गार्गी’ या मराठी चित्रपटाचेही दिग्दर्शन आणि निर्मिती त्यांनी केली होती. प्रेमासाठी वाट्टेल ते आणि बाबुरावला पकडा या चित्रपटांचेही दिग्दर्शन आशिष उबाळे यांनी केले होते. गार्गी हा चित्रपट 2009 मध्ये नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या कार्लस्बर्ग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला होता. त्यांच्या आत्महत्येने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. एक उमदा दिग्दर्शक, अभिनेता अशा पद्धतीने काळाच्या पडद्याआड झाली अशी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.