Suresh Dhas : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. हिवाळी अधिवेशनातही विरोधी पक्षांनी हे प्रकरण उचलून धरलं आहे. या प्रकरणात राज्य सरकार बॅकफूटवर गेलेले असतानाच आमदार सुरेश धस यांनी महायुती सरकारची आणखीनच कोंडी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता मोठा गौप्यस्फोट केला आहे.
आमदार धस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी याआधीही अजित पवारांची भेट घेतली होती. त्यांना सांगितलं होतं की पीक विमा योजनेत मोठा घोटाळा झाला आहे. सात हजार हेक्टरचा घोटाळा एकट्या बीड जिल्ह्यात सापडलाय तर धाराशिव जिल्ह्यात तीन हजार हेक्टरचा घोटाळा सापडला आहे. सोनपेठ तालु्क्यात १३ हजार १९० एकर विमा भरला गेला आहे. विमा भरणारे सीएससी सेंटर देखील परळी तालु्क्यातीलच आहेत.
तुम्ही माझ्यासारखा प्रामणिक माणूस गमावला; सुरेश धस असं का म्हणाले?, पंकजा मुंडेंवर का आरोप केले?
मी परळी तालुक्यातल्या सगळ्या जनतेला किंवा शेतकऱ्यांना दोष देत नाही. मात्र या योजनेचा गैरफायदा घेण्यात आला आहे असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला. २०२३ मध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. महायुती सरकारच्या काळात तत्कालीन कृषिमंत्री यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचा गैरफायदा घेतलाय इतकेच मला म्हणायचे आहे. धनंजय मुंडे यांच्यावर तुम्ही थेट आरोप करताय का असं पत्रकारांनी विचारल्यानंतर सुरेश धस यांनी तत्कालीन कृषीमंत्री असे शब्द उच्चारत काय ते तुम्ही तुमचं शोधा असं उत्तर दिलं. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा सगळा रोख धनंजय मुंडे यांच्याकडेच होता.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर व्हिडिओ कॉल करून मारेकऱ्यांनी त्यांच्या ‘आका’ला दाखविले होते. त्यामुळे या प्रकरणात एसआयटी स्थापन करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली. घटना घडल्याच्या एक ते दोन दिवस अगोदर वाईन शॉपसाठी जे आका आहेत. या शॉपसाठी दोन गाळ्यांची खरेदी झाली. सब रजिस्ट्रारने खरेदी करण्याऐवजी कुठेतरी पोलीस अधिकारी बसले होते तेथे जाऊन खरेदी करून दिली. त्यांचं कार्यक्षेत्र मांजरसुमा घाट आहे तेथे ३० ते ३५ एकर जमीन कुणाच्या तरी नावावर झाली. हे कुणाच्याही शेतातून मुरुम उचलतात. आकांचं कार्यक्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे असे सुरेश धस म्हणाले.
मोठी बातमी! बीड जिल्ह्यात मतदान केंद्रावरच अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
यानंतर या प्रकरणातील आका नक्की कोण असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता धस म्हणाले, आज मुख्यमंत्री या प्रकरणी एसआयटी जाहीर करतील. एसआयटी जाहीर झाल्याशिवाय आणि या प्रकरणाचा तपास झाल्याशिवाय यावर जास्त भाष्य करणं योग्य होणार नाही असे सुरेश धस यांनी सांगितले.