Maharashtra Vidhan Parishad Election Rebel Candidates : महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांनी महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी जागावाटपाचे गणित जुळवले खरे, मात्र स्थानिक पातळीवर नेत्यांनी पक्षाचा आदेश झुगारून थेट बंडखोरीचे निशाण फडकावले आहे. अनेक ठिकाणी थेट मंत्र्यांच्या मुलांनी तर, कुठे बड्या नेत्यांनी ‘अपक्ष’ किंवा बंडखोर अर्ज भरल्यामुळे दोन्ही आघाड्यांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत नेमकी कुठे आणि कोणी बंडखोरी केली? त्याबद्दल जाणून घेऊया…
महायुतीमधील मोठी बंडखोरी
पुणे : पुण्यात राष्ट्रवादीकडून विक्रम काकडेंना उमेदवारी तर, दुसरीकडे भाजपचे वजनदार नेते आणि पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनीही अपक्ष अर्ज भरून महायुतीची कोंडी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर-जालना : येथे मंत्र्यांच्याच मुलाने थेट आव्हान दिले आहे. महायुतीत ही जागा भाजपच्या वाट्याला गेली असून पक्षाने सुहास शिरसाठ यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, भाजपच्या जागेवर हक्क सांगत शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार यांनी थेट अर्ज भरून महायुतीसमोर मोठा तिढा निर्माण केला आहे.
रायगड : या ठिकाणी राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) अनिकेत तटकरे रिंगणात असून, ही जागा राष्ट्रवादीकडे असतानाही शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज भरून बंडखोरीचे आव्हान उभे केले आहे.
सातारा-सांगली : येथे भाजपच्या उमेदवाराला शिवसेनेचा विरोध आहे. महायुतीत ही जागा भाजपने स्वतःकडे ठेवत धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली आहे. पण, या निर्णयामुळे शिवसेनेचे (शिंदे गट) स्थानिक नेते नाराज झाले असून, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांनी थेट बंड पुकारत आपला स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यवतमाळ आणि अमरावती : यवतमाळमध्ये शिवसेनेने दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली आहे, मात्र त्यांच्याविरोधात भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादीचे साजिद बेग यांनी बंडखोरी केली आहे. तर, अमरावतीमध्ये भाजपने प्रवीण पोटे यांना तिकीट दिले आहे, पण त्यांच्याविरुद्ध शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांनी बंडखोर अर्ज दाखल केला आहे.
नाशिक : शिवसेनेचे नरेंद्र दराडे अधिकृत उमेदवार आहेत, पण गिरीश महाजनांचे निकटवर्तीय मानले जाणारे गोकुळ गिते आणि गणेश गिते यांनी अपक्ष अर्ज भरून आव्हान दिले आहे.
परभणी : शिवसेनेच्या सईदा खान यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या विजय जामकर आणि जिल्हा परिषद सदस्य संग्राम जामकर यांनी बंड केले आहे.
नांदेड : भाजपच्या अमरनाथ राजूरकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे प्रवीण पाटील चिखलीकर (आमदार चिखलीकरांचे सुपुत्र) यांनी बंडखोरीचा झेंडा फडकवला आहे.
महाविकास आघाडीतही बंडाचा झेंडा
महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही जागावाटप आणि उमेदवारीवरून तीव्र नाराजी पाहायला मिळत असून, नांदेडमध्ये अंतर्गत त्रिकोणी संघर्ष पाहण्यास मिळत आहे. येथे काँग्रेसकडून रामदास सुमठाणकर यांना उमेदवारी देत मैदानात उतरवण्यात आले आहे. परंतु, काँग्रेसचेच माधवराव जवळकर यांनी बंडखोरी केली आहे. तर दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते नागेश आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा आष्टीकर यांनीही ठाकरे गटाकडून बंडखोर अर्ज दाखल केला आहे.
भंडारा-गोंदिया : काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र पक्षांतर्गत गटबाजीमुळे नरेश ईश्वरकर आणि दिलीप बनसोड यांनीही आपले अर्ज दाखल केल्याने येथे उमेदवारीबाबत प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
सांगली : शरद पवार गटाकडून बाळासाहेब पाटील यांनी अर्ज भरला आहे. पण, आघाडीचा धर्म बाजूला सारत काँग्रेसच्या संजय मेंढे आणि मयूर पाटील यांनीही आपले अर्ज दाखल केल्याने सांगलीत मविआमध्येच मैत्रीपूर्ण लढत किंवा बंडाची स्थिती निर्माण झाली आहे.
सगळ्यांचे लक्ष ‘माघारी’कडे
बंडखोरीच्या या महापुरामुळे दोन्ही आघाड्यांच्या अधिकृत उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत दोन्ही बाजूंचे वरिष्ठ नेते या बंडखोरांना शांत करण्यात यशस्वी होतात की बंडखोर निवडणुकीचे गणित बिघडवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
