मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची चौकशी केली जाणार आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. नांगरे यांच्यासह सुवेझ हक आणि डॉ.शिवाजी पवार यांची चौकशी होणार आहे. मागील दोन वर्षांपासून या आयोगासमोर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. याआधी अनेक पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.
…म्हणुन चौकशी केली जाणार
कोरेगाव भीमा हिंसाचार घडला त्यावेळी विश्वास नांगरे पाटील हे कोल्हापूर परिपरिक्षेत्राचे महानिरीक्षक होते तर सुवेझ हक हे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक होते. याशिवाय सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार हे या प्रकरणात तपास अधिकारी होते. या सगळ्यांची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणी आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही समन्स बजावलं होतं.
या प्रकरणातील आरोपी हर्षाली पोतदार हिची देखील आयोगासमोर चौकशी होणार आहे. तसेच 21 ते 25 जानेवारी दरम्यान तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं काय हे जाणून घेतलं जाणार आहे.
कधी कोणाची चौकशी होणार ?
हर्षाली पोतदारची 21 ते 22 जानेवारी, डॉ शिवाजी पवार यांची 21 ते 23 जानेवारी, विश्वास नांगरे पाटील 24 ते 25 जानेवारी आणि सुवेझ हक यांची 24 ते 25 जानेवारी दरम्यान चौकशी होणार आहे.
कोरेगाव भीमामध्ये 2018 मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने या प्रकरणी कोलकाता हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या नेतृत्वाखाली चौकशी आयोग नेमला आहे. तसंचआता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह आरोपी हर्षाली पोतदार हिची देखील आयोगासमोर चौकशी होणार आहे.