Vivek Kolhe’s political rehabilitation : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार असून अनेकांची नावे आता समोर आली आहे. विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाला 30 जणांची यादी पाठवण्यात आली आहे. यामध्ये कोपरगावचे भाजपचे विवेक कोल्हे यांच नाव असल्याचे समजते आहे. विधान परिषदेवर कोल्हे यांची वर्णी लागली तर खऱ्या अर्थाने त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले असेच चित्र दिसते आहे.
महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे होणाऱ्या विधान परिषदेच्या नऊ जागांकरिता भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या 09 सदस्यांची मुदत 13 मे 2026 रोजी संपणार आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाने 30 जणांची नावे दिल्लीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठवली असल्याचे कळते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
विवेक कोल्हेंसह ही नावे आहे चर्चेत
संदीप जोशी, जगदिश मुळीक, माधवी नाईक, राम सातपुते, मनोज कोटक, अर्चना पाटील चाकूरकर, केशव उपाध्ये, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, डॉ. उपेंद्र कोठेकर, रवी अनासपुरे, राजेश पांडे, संजय भेंडे, दादाराव केचे, संजय केणेकर, प्रमोद जठार, दयाशंकर तिवारी आणि रणजितसिंह निंबाळकर अशा राज्यभरातील विविध नेत्यांचा समावेश आहे.
विवेक कोल्हे यांचे राजकीय पुनर्वसन
2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे विवेक कोल्हे हे कोपरगाव मतदार संघातून इच्छुक होते. मात्र विद्यमान आमदार आशुतोष काळे देखील निवडणुकीच्या रिंगणात असल्याने महायुतीच्या वरिष्ठांना कोल्हे यांना थांबण्याची विनंती केली. कोल्हे यांनी निवडणुकीतून माघार घेत काळे हे आमदार झाले. यामुळे कोल्हे यांचे पुढील राजकीय भवितव्य काय असा सवाल निर्माण झाला.
मात्र त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही त्यांची योग्य दाखल घेतली जाईल असा शब्द भाजपच्या वरिष्ठांकडून कोल्हे यांना देण्यात आला होता. आता त्यांनतर कोल्हे यांचे नाव विधान परिषदेसाठी चर्चेत असल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाऊ शकते अशी चर्चा राजकारणात रंगू लागली आहे.
