गोकुळच्या मतपेटीतून मतदाराचा संताप! ‘तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?’

तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का? अशा शब्दांत मतदाराने आपला संताप व्यक्त केल्याची चर्चा आहे.

Untitled Design   2026 10 19T144837.261

Untitled Design 2026 10 19T144837.261

Voters’ anger emerges from the Gokul ballot box : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू होताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या महिनाभरापासून गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती आणि सतेज पाटील यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष सुरू होता. मात्र, या निवडणुकीत मतदारांना परडीतील भंडाऱ्यावर हात ठेऊन शपथ देण्याच्या प्रकाराने विशेष लक्ष वेधून घेतलं होतं. आता याच शपथ प्रकरणावरून एका मतदाराने थेट मतपेटीतून आपला संताप व्यक्त केल्याची चर्चा रंगली आहे.

निवडणुकीदरम्यान मतदारांना शपथ देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यासह महायुतीच्या नेत्यांकडून मतदारांनी पॅनल टू पॅनल मतदान करावं, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं या प्रकरणातून समोर आलं होतं. मात्र, मतदारांना अशा पद्धतीने शपथ देण्याच्या प्रकारावरून नाराजी व्यक्त केली जात होती.

गोकुळच्या मतमोजणीदरम्यान मतपेटीत एक चिठ्ठी आढळल्याची माहिती समोर आली आहे. या चिठ्ठीतून एका मतदाराने नेत्यांना थेट सवाल केल्याचं सांगितलं जात आहे. तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का? अशा शब्दांत मतदाराने आपला संताप व्यक्त केल्याची चर्चा आहे. त्यामुळे शपथ देण्याचा प्रकार मतदारांना कितपत रुचला, याबाबत आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

टायगर श्रॉफवर गोळ्या झाडणारे आणि त्यांचे ‘आका’ दोघेही पकडले जाणार! मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

दुसरीकडे, गोकुळच्या निवडणुकीत पॅनल टू पॅनल मतदान व्हावं, यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, कागल, करवीर आणि राधानगरी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे मतदारांनी पॅनलच्या गणिताला छेद दिला असेल, तर त्याचा फटका नेमका कोणाला बसणार, याकडे संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष लागलं आहे.

मतदारांना शपथा देऊनही क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा खरी ठरल्यास महायुतीच्या रणनीतीसमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं. मात्र, प्रत्यक्ष निकालातूनच या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. या निवडणुकीत महायुतीविरुद्ध सतेज पाटील असा थेट सामना रंगला. सतेज पाटील यांनी महायुतीला आव्हान देत निवडणुकीत ताकद पणाला लावली. त्यांच्या पॅनलमधील तब्बल 18 उमेदवार नवखे असल्याची चर्चा असताना, दुसरीकडे गोकुळमध्ये अनेक वर्षांपासून प्रभाव राखून असलेले प्रस्थापित चेहरे महायुतीच्या बाजूने मैदानात होते.

त्यामुळे या निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी क्रॉस व्होटिंगचा पर्याय निवडला का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मतपेटीत सापडल्याचं सांगितलं जाणारं चिठ्ठी प्रकरण आणि क्रॉस व्होटिंगच्या चर्चांमुळे गोकुळच्या निकालाकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. अखेर मतदारांनी नेत्यांच्या शपथांना प्रतिसाद दिला की मतपेटीतून आपली नाराजी व्यक्त केली, याचं चित्र निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version