गोकुळ दूध संघातील 427 संस्थांचा मतदानाचा अधिकार रद्द, सतेज पाटील आणि अरुण डोंगळेंचा न्यायालयात जाण्याचा इशारा

अपात्र ठरविण्यात आलेल्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.

Untitled Design 24

Untitled Design 24

Voting rights of 427 organizations in Gokul Dudh Sangh cancelled : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपूर्वी 427 दूध संस्थांना मतदानासाठी अपात्र ठरविण्यात आल्याने संघाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे. मंगळवारी दिवसभर विविध दूध संस्थांचे प्रतिनिधी गोकुळ कार्यालय आणि सहाय्यक निबंधक कार्यालयात भेटी देत निर्णयाची माहिती घेत होते. संस्थाचालकांचा आरोप आहे की, त्यांच्या संस्थांची चौकशी पूर्ण झालेली नाही, तसेच अपात्र ठरविण्यापूर्वी कोणतीही नोटीस किंवा खुलासा मागविण्यात आलेला नाही.

संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केला की, निवडणुकीसाठी ठरावपत्रे आणि मसुदा सादर करण्याच्या अंतिम दिवशीच 427 संस्थांचा मतदानाचा अधिकार का काढून घेण्यात आला? या निर्णयामागे राजकीय हेतू असल्याचा संशयही काही प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. दरम्यान, एखाद्या संस्थेचा मतदानाचा अधिकार काढून घेतल्यास तिच्या सभासदत्वावरही परिणाम होऊ शकतो, असा मुद्दा पुढे आला आहे. सभासद असूनही मतदानाचा अधिकार नाकारला जात असल्यास सभासदत्व धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे. या संस्थांना निवडणूक प्रक्रियेतील हरकतींच्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे.

आज शिवकुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, यतींद्र सिद्धरामय्या यांच्यासह अनेक दिग्गज मंत्रिपदाच्या शर्यतीत

गोकुळ दूध संघाच्या एकूण 5470 मतदार संस्थांपैकी 1320 संस्था अवसायनात असल्याची तक्रार करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या सुनावणीनंतर 427 संस्था अपात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय पावसाळ्यातील 541 संस्थांनाही मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अंतिम पात्र आणि अपात्र संस्थांची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. या निर्णयाविरोधात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन्ही नेत्यांनी अपात्र ठरविण्यात आलेल्या संस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

करवीर तालुक्यातील भुये येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर गंभीर आरोप केले. भावकीच्या वादाचा फटका दूध उत्पादक शेतकरी आणि संस्थांना बसत आहे. गोकुळच्या दूध संकलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संस्थांना मतदानापासून दूर ठेवणे हा अन्याय आहे, असे ते म्हणाले. तसेच गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट होऊ नये आणि तो जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाच दूध संघ राहावा, यासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुंबईत असलेल्या माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दूरध्वनीवरून प्रतिक्रिया देताना हा निर्णय राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप केला. जाणीवपूर्वक संस्था अपात्र ठरविण्यात आल्या असून न्याय मिळवण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे असून, अपात्र संस्थांच्या न्यायालयीन लढाईकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version