Samrudhi Highway Murder : वाशिम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर (Samrudhi Highway Murder) आलीयं. एक व्यक्ती 3 चिमुकल्यांना घेऊन थेट वाशिम ग्रामीण पोलिस ठाण्यात आला. पोलिस ठाण्यात येताच साहेब, माझ्या गाडीच्या डिक्कीत माझ्या बायकोचा मृतदेह आहे, तिची हत्या मी केलीयं, अशी कबुली देत पोलिसांना शरण आलायं. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आरोपीने हे शब्द उच्चारताच पोलिसही क्षणभरासाठी स्तब्ध झाले.
आरोपी सलमान खान हा एक बांधकाम ठेकेदार असून उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. सलमान आपली पत्नी हसीना बानो आणि तीन चिमुकल्यांसह नाशिककडे निघाला होता. वर्ध्यातून समृद्धी महामार्गावर आल्यानंतर प्रवास सुरु असतानाच पत्नी-पतीमध्ये संशयाच्या कारणावरुन वाद झाला. शब्दाने शब्द वाढत गेला अन् शेवटी सलमान खानने समृद्धी महामार्गावर गाडी थांबवून पत्नीच्या डोक्यात रॉडने वार केला. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी होऊन अक्षरश: रक्तबंबाळ झाली.
सलमान खानने पत्नीवर रॉडने हल्ला केल्यानंतर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने ओढणीच्या मदतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची कबुली सलमान खानने पोलिसांना दिली आहे. त्यानंतर पत्नीचा मृतदेह कारमध्येच ठेवून आरोपीने लहान मुलांसह तब्बल 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास केला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास सलमानने वाशिम ग्रामीण पोलिस ठाणे गाठत कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
या संपूर्ण घटनेबद्दल तिन्ही चिमुकल्यांना तसूभरही माहिती नव्हती. पोलिस ठाण्यात आपल्या वडिलांसोबत आल्यानंतर ते निरागसपणे इकडून तिकडे खेळत-बागडत होते. एका बाजूला आईचा मृतदेह ततर दुसऱ्या बाजूला चिमुकले खेळत असल्याचं ह्रदयद्रावक दृश्य पाहुन पोलिस कर्मचाऱ्यांचे मन अगदी हेलावून गेले.
