अहिल्यानगर : सेवेतून बडतर्फ झालेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे वडिल आणि आईविरुद्ध एसीबीने (ACB) मोठी कारवाई केलीय. निवृत्ती सनदी अधिकारी दिलीप कोंडीबा खेडकर (Dilip Khedkar) त्यांची पत्नी मनोरमा यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आली आहे. दिलीप खेडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी म्हणून ते निवृत्त झालेले आहेत. त्यांच्याकडे तब्बल तेरा कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे.
खेडकर यांच्या पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील निवासस्थानासह विविध ठिकाणच्या मालमत्तांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी पहाटे एकाचवेळी छापे टाकले. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. अहिल्यानगर एसीबीचे अधिकारी-कर्मचारी तसेच पाथर्डी पोलिसांचीही मदत घेण्यात आली. कारवाईसाठी ३० हून अधिक अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले असून मोठा लवाजमा बालगाव भल्या पहाटे दाखल झाला होता.अनेक तास झाडाझडती असल्याची असल्याची माहिती आहे.
अहिल्यानगर येथील पंढरीनाथ शंकर साबळे यांनी 2012 साली एसीबीकडे तक्रार केली होती. एसीबीने दाखल केलेल्या एफआयआरनुसार दिलीप खेडकर व त्यांच्या पत्नी मनोरमा दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्डी पोलिस ठाण्यात 29 सप्टेंबर 2026 रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारदार म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक सविता देविदास तांबे यांनी तक्रार दाखल केली आहे.
दिलीप खेडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात 1989 पासून सेवेत होते. विविध ठिकाणी उपप्रादेशिक अधिकारी व प्रादेशिक अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. 31 मे 2023 रोजी ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या मालमत्तेबाबत यापूर्वी सुरू असलेल्या चौकशीचा कालावधी 1995 ते डिसेंबर 2023 असा निश्चित करण्यात आला होता. या कालावधीत खेडकर व त्यांच्या कुटुंबीयांचे उत्पन्न, खर्च, मालमत्ता आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणी कालावधीत खेडकर कुटुंबाचे एकूण ज्ञात उत्पन्न 13 कोटी 2 लाख 78 हजार रुपये, तर एकूण खर्च 15 कोटी 33 लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्ञात मालमत्तेचे मूल्य 10 कोटी 99 लाख रुपये असल्याचे नमूद आहे. उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांच्या तुलनेत मालमत्ता व खर्चाची रक्कम 13 कोटी 30 लाख रुपये आहे. म्हणजेच ज्ञात उत्पन्नाच्या सुमारे १०२ टक्के अधिक आहे.
एफआयआरच्या कागदपत्रांमध्ये खेडकर यांना सेवाकालात मिळालेले निव्वळ उत्पन्न, संगणक खरेदीसाठी घेतलेली आगाऊ रक्कम, बँक कर्ज, एलआयसी पॉलिसींमधून मिळालेल्या रकमांसह सेवानिवृत्तीच्या वेळी मिळालेले जीपीएफ, रजा रोखीकरण, ग्रॅच्युइटी, पीएफ तसेच इतर रकमांचा तपशील देण्यात आला आहे. कागदपत्रांमध्ये नमूद उत्पन्नाची विविध रक्कम आणि तिचे स्रोत स्वतंत्रपणे नोंदविण्यात आले आहेत.
याउलट, कुटुंबाच्या खर्चाच्या नोंदींमध्ये स्थावर मालमत्ता, बांधकाम, फर्निचर व वस्तूंची खरेदी, वाहनांवरील खर्च, इंधन, शिक्षण, विमा, बँक व्यवहार तसेच अन्य विविध खर्चांचा समावेश असल्याचे एफआयआरच्या जोडपत्रातील नोंदींवरून दिसून येते. या खर्चांची एकूण रक्कम 15 कोटी 33 लाख 74 हजार अंतिम निष्कर्षात नमूद आहे.
एफआयआरमध्ये पुण्यातील बाणेर येथील नॅशनल हाउसिंग सोसायटीतील मालमत्तेचाही उल्लेख आहे. तसेच बाणेर रोड परिसरातील सुमारे 750 चौरस फूट क्षेत्रावरील फ्लॅटच्या बांधकामासाठी तसेच फर्निचर व वस्तू खरेदीसाठी झालेल्या खर्चाची स्वतंत्र नोंद करण्यात आली आहे. या खर्चासाठी 70 लाख 38 हजार अशी रक्कम नमूद आहे.
